कोणत्या मास्तरांनी कान पिळायचा हे मला ठरवता आले नाही. त्यामुळे आपल्याला नको असलेली मंडळी असली तरी आहे त्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेणे हेच विद्यार्थ्यांचे काम आहे. म्हणूनच संप करून ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे विद्यार्थी आपलेच नुकसान करून घेत आहेत, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी संपकर्त्यां विद्यार्थाचे शनिवारी कान टोचले. वेळ वाया घालवू नका. लवकर तोडगा काढून कामाला लागा आणि अभ्यास करा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता नानांनी ही टिप्पणी केली. मात्र, गजेंद्रच्या जागी माझी नियुक्ती केली असती तर मी ते पद स्वीकारले नसते. ज्या मुलांसाठी इन्स्टिटय़ूट आहे त्यांनाच मी नको असेल तर मी आपणहून बाजूला जाईन. अशा पद्धतीच्या नियुक्तया कशा होतात हे मला माहीत नाही. मला त्या पदाच्या गरजा काय आहेत हेही माहीत नाही. त्या संस्थेतून इतकी छान मंडळी बाहेर पडली आहेत. आपण नको असले तर बाजूला व्हायचे. पण, त्याला गलिच्छ स्वरूप येता कामा नये.
गजेंद्रची एकही भूमिका मी पाहिली नाही. माझ्या मनातले महाभारत वेगळे आहे. माझ्यालेखी धर्मराज, भीम, युधिष्ठिर, दुर्योधन, कर्ण हे वेगळे आहेत. त्यांना धक्का लागू नये म्हणून मी महाभारत पाहिले नाही. मीही नट असल्याने गजेंद्रने कोणत्या चित्रपटात कामे केली याविषयी मला काही म्हणायचे नाही. पण, काम करत नाही तोपर्यंत तो पात्र आहे की नाही ते कसे कळणार, असा प्रश्नही पाटेकर यांनी उपस्थित केला.
राजन ताम्हणे याच्या नाटकाच्या वाचनाला मी हजर होतो. मला ते विलक्षण आवडले आहे. महिनाभरात तालमी सुरू होतील. आणि २० वर्षांनी पुन्हा नाटक करतो याचा मलाच मनस्वी आनंद आहे, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.
दानशूरांनी एक-एक शेतकरी दत्तक घ्यावा
राज्यामध्ये दुष्काळाचा प्रश्न असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बरं त्यांची कर्ज तरी किती आहेत १५ ते २० हजार. एवढय़ा कमी रकमेच्या कर्जासाठी बिचारे आत्महत्या करतात. पोटापुरते भागून ज्यांच्याकडे अधिक आहे अशा समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन एक-एक शेतकरी दत्तक घ्यावा. म्हणजे किमान शेतकरी आत्महत्या तरी थांबतील, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा