पुणे : अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपटाशी संबंधित तांत्रिक विभागांत आपल्या कामाने स्वतंत्र ‘विद्यापीठे’ तयार करणारे अनेक कलाकार ज्या राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) तालमीत शिकून बाहेर पडले, ती संस्था आता इथून पुढे ‘विद्यापीठ’ म्हणूनच ओळखली जाईल. फिल्म इन्स्टिट्यूट नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘एफटीआयआय’ला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल केला आहे. पदविका देणारी ही संस्था आता पदवी, संशोधन, पोस्ट डॉक्टोरल संशोधन आणि इतर नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमही आता तयार करून शकणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) माध्यमातून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून ‘एफटीआयआय’ला विशिष्ट (डिस्टिन्क्ट) श्रेणीमध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नसीरुद्दीन शाह, जया भादुरी, शत्रुघ्न सिन्हा, शबाना आझमी अशा दिग्गजांपासून अलीकडच्या काळातील उमदा अभिनेता राजकुमार रावपर्यंत आणि विधू विनोद चोप्रा, (पान ८ वर) (पान १ वरून) संजय लीला भन्साळींसारख्या, कलात्मक-व्यावसायिक चित्रपटांद्वारे ठसा उमटविणाऱ्या दिग्दर्शकांपासून ऑस्कर मिळविणाऱ्या रेसुल पोकुट्टीसारख्या ध्वनिआरेखकापर्यंत अनेक कलाकार ‘एफटीआयआय’मध्ये घडले आहेत. पूर्वीच्या प्रभात स्टुडिओच्या जागी १९६०च्या दशकात उभी राहिलेली ही चित्रपटकलेचे शिक्षण देणारी संस्था आता ‘विद्यापीठ’ झाल्यामुळे तिला आणखी झळाळी येईल, अशी आशा आहे.
‘एफटीआयआय’ ही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्था. सन २०१४मध्ये तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी एफटीआयआयला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अलीकडेच संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी विद्यामान माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘एफटीआयआय’ला दिलेल्या भेटीदरम्यान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधून त्यांची मतेही जाणून घेतली होती.
‘एफटीआयआय’चा प्रस्ताव विचारात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलै २०२४मध्ये तज्ज्ञ समिती नियुक्त केली. त्यानंतर यूजीसीच्या सल्ल्यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून ‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी काही अटींची पूर्तता तीन वर्षांत करण्याच्या अधीन राहून इरादापत्र दिले. त्यानुसार ‘एफटीआयआय’च्या संचालकांनी १७ जानेवारी २०२५ रोजी अटींच्या पूर्ततेसंदर्भातील अहवाल यूजीसीला सादर केला. यूजीसीने तो प्रस्ताव तज्ज्ञ समितीसमोर ठेवला. तज्ज्ञ समितीच्या शिफारशी ‘यूजीसी’च्या १३ मार्च २०२५ रोजी झालेल्या ५८८व्या बैठकीत मान्य करण्यात आल्या. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २२ एप्रिल रोजी ‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल केल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले.
‘एसआरएफटीआय’ही अभिमत विद्यापीठ
‘एफटीआयआय’प्रमाणेच कोलकाता येथील सत्यजित रे इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटलाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती ‘एफटीआयआय’ने दिली.
विशिष्ट श्रेणीतील अभिमत विद्यापीठाच्या दर्जामुळे ‘एफटीआयआय’ला वैशिष्ट्यपूर्ण ओळख टिकवून ठेवण्यासह जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून लाभ मिळवणे शक्य होईल. त्यात पदवी प्रदान करणे आणि संशोधनाची संधी हे तत्काळ मिळणारे लाभ आहेत, तर नवोपक्रम आणि शैक्षणिक क्षेत्राशी जोडले जाण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या छत्राखाली अधिक लवचीकता आणि संधी उपलब्ध होऊ शकतील.– धीरज सिंग, संचालक, एफटीआयआय