‘रुपेरी पडद्यावरील तारे-तारकांची, माझीही बरेच जण नक्कल करतात, पण आजवर मी कुणाचीही नक्कल केलेली नाही. आपले व्यक्तिमत्त्वच असे तयार करा की लोक तुमच्या मागे येतील,’ असा कानमंत्र प्रसिद्ध अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी तरुण कलाकारांना दिला.
‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’तर्फे (एफटीआयआय) आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल स्टुडंट्स फिल्म अॅवॉर्ड्स’ आणि ‘स्टुडंट्स फिल्म फेस्टिव्हल’चे मंगळवारी शत्रुघ्न सिन्हा, मल्याळम् चित्रसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन्, प्रसिद्ध संगीतकार व पियानोवादक जेरार्ड ग्रबर, संस्थेचे संचालक डी. जे. नरेन यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या वेळी सिन्हा विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत होते.
सिन्हा म्हणाले, ‘‘मी आयुष्यात जे काही बनलो त्याचे श्रेय एफटीआयआयचे आहे. एकतर तुम्हाला इतरांपेक्षा अधिक चांगले काम करावे लागेल किंवा इतरांपेक्षा वेगळे काम करावे लागेल, ही शिकवण मला इथे मिळाली. अनेकजण सिनेस्टार्सना ‘कॉपी’ करतात. मी कुठे गेलो की अगदी लहान-लहान मुलेही मला ‘खामोश’ म्हणून दाखवा ना, अशी विनंती करतात! आजवर मी कुणाचीही नक्कल केली नाही. तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व असे तयार करा की लोकच तुमच्या मागे येतील!’’
देशातील विविध प्रांतांमध्ये आपले कसे ‘बारसे’ केले जाते याचे गमतीदार किस्से सांगून सिन्हा यांनी नेहमीप्रमाणे उपस्थितांची दाद मिळवली. ते म्हणाले, ‘‘माझे पूर्ण नाव शत्रुघ्न प्रसाद सिन्हा. ‘शत्रुघ्न’चा उच्चार अवघड असल्याने हे नाव बदलण्याचा विचार मी करत होतो. दिग्दर्शक मणी कौल हे माझे सीनिअर होते. ते म्हणाले, ‘तुम्हारा काम चलेगा तो नाम भी चलेगा!’ मी त्यांचे ऐकले. पण वेगवेगळ्या भाषांमध्ये माझ्या नावाचा उच्चार वेगवेगळाच केला जातो! ‘शत्रू’ आणि ‘शॉटगन’ ही नावे मात्र मला महाराष्ट्राने बहाल केली.’’
नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने सिनेमाच्या चळवळीला बळ यावे – अदूर गोपालकृष्णन्
अदूर गोपालकृष्णन् म्हणाले, ‘‘सिनेमा या माध्यमाच्या तंत्रज्ञानात काळानुसार खूप बदल होत आले आहेत. हे माध्यम हाताळणे आज अधिक सोपे आणि व्यापक झाले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सिनेमाच्या चळवळीला बळकटी आणण्यासाठी झाला पाहिजे.’’
कुणाचीही ‘कॉपी’ नको; लोकांना तुमच्या मागे येऊ द्या! – शत्रुघ्न सिन्हा
‘रुपेरी पडद्यावरील तारे-तारकांची, माझीही बरेच जण नक्कल करतात, पण आजवर मी कुणाचीही नक्कल केलेली नाही. आपले व्यक्तिमत्त्वच असे तयार करा की लोक तुमच्या मागे येतील,’
First published on: 25-02-2015 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ftii shatrughan sinha cinema