‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या नियुक्तीमुळे शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा आरोप करीत डाव्या पक्षांच्या विविध संघटनांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. आता डाव्यांच्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ‘डावे’ हेच ‘उजवे’ ठरले आहेत.
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी मागणी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए), ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), युवक क्रांती दल (युक्रांद), नवसमाजवादी पर्याय, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), युवा भारत संघटना, ऑल इंडिया युथ फेडरेशन (एआयवायएफ), छात्रभारती, राष्ट्र सेवा दल, लोकायत, लोकराज्य युवक संघटना, ऑल इंडिया रिव्होल्युशनरी स्टुडंट्स ऑर्गनाझेशन (एआयआरएसओ) आणि पुरोगामी युवक संघटना या डाव्या चळवळीतील विविध संघटनांनी एफटीआयआय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
सरकारच्या हुकूमशाही आणि जातीयवादी धोरणाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असून आम्हाला या लढय़ाचा अभिमान आहे. भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीचे सारे संकेत पायदळी तुडवत संघप्रणीत कृती कार्यक्रम रेटण्याचा प्रकार या नियुक्तीमधून झाला आहे. त्याला विरोध करीत विद्यार्थी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्ती उपलब्ध असताना अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि बेताल वक्तव्ये करणाऱ्या कार्यकर्त्यांची नेमणूक करून राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची बक्षिसी दिली आहे, अशी भूमिका या संघटनांनी मांडली. विद्यार्थ्यांंच्या आंदोलनाचा सकारात्मक विचार करून आठ दिवसांत मागण्या मान्य न केल्यास सर्व संघटनांतर्फे मूक मोर्चा आणि निदर्शने करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Story img Loader