बेकायदेशीर रीत्या एकत्र येण्याचा प्रयत्न, संचालकांना जबरदस्तीने डांबून ठेवणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि कार्यालयाची तोडफोड करणे या आरोपांवरून ‘फिल्म अँड टेलिव्हजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या पाच विद्यार्थ्यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यांची बुधवारी सायंकाळी जामिनावर सुटका झाली. या प्रकरणी अटक झालेल्या पाच जणांसह १७ विद्यार्थ्यांवर नावानिशी तर आणखी २५ ते ३० विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संस्थेत सोमवारी घडलेल्या तणावपूर्ण प्रसंगानंतर संचालक प्रशांत पाठराबे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. २००८ सालच्या विद्यार्थ्यांच्या अजूनही अपूर्ण असलेल्या चित्रपट प्रकल्पांच्या मूल्यमापनाचा निर्णय संचालकांनी घेतल्यामुळे गेला आठवडाभर विद्यार्थी आणि संचालकांमध्ये वाद पेटला होता. या कारवाईबद्दल पाठराबे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू सांगितली.
सोमवारी मूल्यमापनाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ६ विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले होते. परंतु ४० ते ५० विद्यार्थी संचालक कार्यालयात घुसले, असे पाठराबे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मी त्यांना मूल्यमापनाबद्दलचा माझा निर्णय सांगितल्यावर त्यांनी ‘आम्ही तुम्हाला बाहेरच जाऊ देणार नाही,’ असे सांगितले. सुरुवातीला मी पोलिसांना बोलावणे टाळले, परंतु ३-४ तासांनंतरही तीच परिस्थिती राहिल्यावर मला पोलिसांना बोलावणे भाग पडले. विद्यार्थ्यांनी मानवी साखळ्या करून मला जबरदस्तीने अडवून धरले. विद्यार्थी सतत तोच-तोच प्रश्न विचारून मला माझा निर्णय मागे घेण्यासाठी भीती दाखवत होते. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत किंवा निर्णय मागे घेतला नाही, तर मी संचालकाच्या खुर्चीत बसण्यास लायक नाही, असे म्हणत त्यांनी मला अतिशय अपमानास्पद वागणूक दिली. हे सर्व मी पोलिसांना सांगितले. पोलिस संस्थेत आल्यानंतरच रात्री अकरा वाजता मी कार्यालयातून बाहेर येऊ शकलो. त्यानंतर सुद्धा विद्यार्थी मला त्याच प्रश्नांची उत्तरे देण्यास भाग पाडत होते.’
‘विद्यार्थ्यांचे हे नियमबाह्य़ वर्तन खपवून घेतले असते तर पुढे ते कसेही वागण्यास धजावतील. संस्थेचा प्रत्येक निर्णय केवळ विद्यार्थ्यांच्या मान्यतेवर अवलंबून असू शकत नाही,’ असेही पाठराबे म्हणाले.
केंद्र शासनाची त्रिसदस्यीय समिती येणार
केंद्र शासनाच्या तीन सदस्यांची समिती येत्या दोन ते तीन दिवसांत सद्य:स्थितीचा अभ्यास करण्यासाठी संस्थेत येणार असून ते विद्यार्थ्यांशीही बोलतील, असे पाठराबे यांनी सांगितले. ‘आरएनआय’चे (ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया) महासंचालक एस. एम. खान, चित्रपट विभागाच्या संचालक अंशू सिन्हा, अंतर्गत सचिव एस. नागनाथन यांचा या समितीत समावेश आहे.
दोन वर्षे नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश न देताही
जुन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण नाहीच!
२००८ सालचे विद्यार्थी संस्थेतले सर्वात जुने विद्यार्थी आहेत. ‘संस्थेच्या विद्या परिषदेने एप्रिल २०१४ ला दिलेल्या निर्णयात विद्यार्थ्यांच्या अजूनही अपूर्ण असलेल्या प्रकल्पांचे ‘जसे आहे तसे’ स्वरूपात मूल्यमापन करण्यास मान्यता दिली होती, दोन वर्षे ‘झीरो इअर’ म्हणून जाहीर करून या वर्षांना नवीन प्रवेश न करता देखील जुन्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही,’ असे पाठराबे म्हणाले.   
विद्यार्थ्यांनी आरोप फेटाळले
– शिक्षक विद्यार्थ्यांच्या बाजूने
‘सोमवारी चर्चेप्रसंगी आमच्याबरोबर शिक्षकही होते, आम्ही कोणत्याही प्रकारे पाठराबे यांचा छळ केलेला नाही,’ असे म्हणत विद्यार्थ्यांनी पाठराबे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची बाजू घेतली आहे. दिग्दर्शन विभागाचे प्रमुख संदीप चटर्जी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांवर मध्यरात्री करण्यात आलेल्या कारवाईचा शिक्षक निषेध करत असून ही परिस्थिती वेगळ्या प्रकारे हाताळली असती, तर ही वेळ आली नसती. मूल्यमापन ही गंभीर गोष्ट असून त्याबद्दल आधी सविस्तर चर्चा व्हायला हवी होती.’ संचालकांबरोबर झालेली बैठक सुरुवातीपासून तणावपूर्ण परिस्थितीत नव्हती, असेही ते म्हणाले.

Story img Loader