‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थी आणि सरकार यांच्यात निर्माण झालेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी तातडीने संप मागे घेतला नाही, तर त्यांच्यावर संस्थेकडून कडक प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला असताना विद्यार्थ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात सरकारने ताठर भूमिका घेऊ नये आणि चर्चेतून मार्ग काढावा, अशी मागणी संपकरी विद्यार्थ्यांनी केली आहे. आता यावर संस्थेचे प्रशासन आणि सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी तातडीने संप मागे घेतला नाही, तर त्यांच्यावर संस्थेकडून कडक प्रशासकीय कारवाई होऊ शकेल, असे सांगून संस्थेचे संचालक डी. जे. नरेन यांनी विद्यार्थ्यांना कोणताही विलंब न करता अभ्यासाला सुरुवात करण्याचा आदेश बुधवारी दिले होते.
नरेन यांनी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नाचिमुथ्थू हरिशंकर यांच्या नावे असे पत्र काढले. हे आदेश आपण आपल्याच अधिकारात काढले असल्याचे नरेन यांनी पत्रकारांना सांगितले. याहून अधिक काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. या पत्राचा मजकूर असा आहे – ‘संचालकांनी विद्यार्थ्यांना लेखी व तोंडी स्वरूपात संप तातडीने बंद करून शैक्षणिक कामाला सुरुवात करण्यास सांगितले आहे. याचे पालन न करता संप सुरूच ठेवल्यास विद्यार्थ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते. यात विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची कारवाईही होऊ शकेल. या कारवाईस विद्यार्थी स्वत: जबाबदार असतील.’
या नोटिसीवर गुरुवारी संपकरी विद्यार्थ्यांनी भूमिका मांडली. त्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, चर्चा करण्यास तयार असल्याचेही म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा