पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढल्याने देशातील तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे इंधन दरात कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी याबाबाबतची मागणी पंतप्रधान आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे भाव कमी होऊन प्रतिबॅरल ७० ते ७३ डॉलरवर आले आहेत.
मागील काळात हे भाव वाढले असल्याने देशातील तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. आता हे भाव कमी होऊनही तेल कंपन्या इंधन दरात कपात करीत नाहीत. वाहतूक व्यवसायात सर्व प्रमुख घटक हा इंधन हा असतो. त्यातील वाढीमुळे वाहतूक दर वाढले असून, महागाईत भर पडली आहे. इंधनाच्या जास्त दरांमुळे वाहतूकदारांना व्यवसाय करणे कठीण जात आहे. इंधन दर आणि वाढती महागाई यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केल्यास त्यांना वाहतूकदारांना दिलासा मिळेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झालेल्या खनिज तेलाच्या भावाचा फायदा तेल कंपन्यांनी मालवाहतूकदारांपर्यंत पोहोचवावेत, असे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.