पुण्यात पेट्रोल ८७.१३, डिझेल ७५.७० रुपये लिटर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र आणि राज्य शासनाने इंधनाच्या दरात कपात केल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी आणखी काही पैशांची घट झाली, मात्र करकपात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू झाली असून, दोन दिवसांत पेट्रोलच्या दरात २३ पैशांची वाढ झाली. डिझेलच्या दरातही रविवारी प्रतिलिटर ३० पैशांची वाढ होणार आहे. करकपातीनंतर शुक्रवारी शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८६.८१, तर डिझेलचा दर ७६.१० रुपये होता. डिझेल शनिवारी ७५.४० रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र दोन्ही इंधनदरात रविवारी वाढ होणार असून, पेट्रोलचा दर ८७.१३, तर डिझेलचा दर ७५.७० रुपये होणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पाच रुपयांची घट होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी प्रत्यक्षात पेट्रोलच्या दरामध्ये ४.३६ रुपयांनी, तर डिझेलच्या दरामध्ये केवळ २.५९ रुपयांची कपात करण्यात आली. शहरात २०१४ मध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६० रुपयांच्या आसपास होता. २०१७ मध्ये तो ८० रुपयांच्या पुढे गेला.

यंदाच्या मे महिन्यामध्ये पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पहिला उच्चांक नोंदविला गेला होता. या कालावधीत पेट्रोल ८६ रुपयांपर्यंत, तर डिझेलचा दर ७२.५० रुपयांपुढे पोहोचला होता. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात पेट्रोलच्या दराने नव्वदी ओलांडून सर्वच उच्चांक मोडीत काढले होते.

शासनाने करकपातीचा निर्णय घेतला, त्या दिवशी ४ ऑक्टोबरला शहरात पेट्रोल ९१.१६ रुपये, तर डिझेल ७८.६९ रुपयांवर होते. मागील महिनाभराचा विचार केल्यास एकाच महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले होते. त्यामुळे सर्वच नागरिकांसह वाहतूकदारांनाही त्याची झळ बसत होती.

करकपातीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळून पेट्रोलचे दर नव्वदीच्या खाली उतरले आहेत. डिझेलच्या दरात शनिवारी  ७० पैशांचा दिलासा मिळाला. मात्र डिझेलसह पेट्रोलच्या दरांत रविवारी पुन्हा काही पैशांनी वाढ होणार आहे. ऑल इंडिया पेटेल डिलर असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीवरून  हे स्पष्ट झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel prices hike
Show comments