पुणे : नागपूरमधील समता सहकारी बँकेतील १४५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात १७ वर्ष फरारी असलेल्या आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने हैद्राबादमधून अटक केली. फरारी आरोपी गेली १७ वर्ष पुणे, मुंबई, तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
विजयकुमार रामचंद्र दायमा (रा. फेअर व्ह्यू सोसायटी. गोदावरी होम्स, सुचित्रा जेडीमेटला, हैद्राबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नागपूर येथील समता सहकारी बँकेतील अधिकारी, कर्मचारी, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाने बनावट कर्जप्रकरणे सादर करून १४५ कोटी ६० लाख रुपयांचा गैरव्यवहार केला होता. याप्रकरणी नागपूरमधील सीताबर्डी पोलीस ठाण्यात २००७ मध्ये अपहार, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी ५७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती विचारात घेता याप्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडून सीआयडीच्या नागपूर कार्यालयाकडे सोपविण्यात आला होता. सीआयडीच्या आर्थिक गु्न्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. दायमा गेली १७ वर्ष पुणे, मुंबई, तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत होता.
हेही वाचा : पिंपरी : मतदानाला गेले आणि चोरट्याने घर फोडले
तो हैद्राबादमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती सीआयडीच्या पुणे कार्यालयातील पथकाला मिळाली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला हैद्राबादमधून अटक केली. त्याला नागपूरमधील सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले आहे. सीआयडीच्या पुणे कार्यालयाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. दिलीप पाटील- भुजबळ, पोलीस अधीक्षक वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावडे, हवालदार विकास काेळी, सुनील बनसोडे, प्रदीप चव्हाण यांनी ही कारवाई केली.