पुणे : झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला वारजे माळवाडी पाेलिसांनी लोणावळ्यातून अटक केली. अभिजीत उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय २४, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलीय आयुक्त अमितेशकुमार यांनी आरोपी येळवंडे याच्याविरूद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली होती. कारवाईनंतर त्याला नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते.
कारवाईची माहिती मिळाल्यानंतर येळवंड पसार झाला होता. गुन्हे शाखा, तसेच वारजे माळवाडी पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तो राहण्याची ठिकाणे बदलत होता. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक संजय नरळे आणि तपास पथक येळवंडेच्या मागावर होते. तो लोणावळ्यात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाउसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश बडाख, साळुंखे, योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, प्रशांत चव्हाण, रियाज शेख, विजय खिलारी, किरण तळेकर यांनी ही कामगिरी केली.
हेही वाचा – भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
वारजे भागात गोळीबार
आरोपी अभिजीत येळवंडे याने जून २०२१ मध्ये रवींद्र तागुंदे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. या गुन्ह्यात येळवंडेसह साथीदारांना अटक करून पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये आरोपी येळवंडेने न्यायालयाकडून जामीन मिळविला. त्यानंतर त्याने पुन्हा वारजे भागात गुन्हे करण्यास सुरुवात केली. ऑगस्ट २०२४ मध्ये त्याला दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपार केल्यानंतर तो पुन्हा शहरात आला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाईचे आदेश दिले होते.