पुणे : पुणे विमानतळावर आता सुरक्षा तपासणींसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. कारण विमानतळावर प्रवाशांच्या तपासणी फुल बॉडी स्कॅनर बसविण्याचा हवाई वाहतूक प्राधिकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने मंजूर केला आहे. ही सुविधा पुण्यासह कोलकता, चेन्नई आणि गोवा विमानतळावर उपलब्ध होणार आहे. देशातील चार संवेदनशील मानल्या जाणाऱ्या विमानतळांची निवड यात करण्यात आली आहे.
सध्या पुणे विमानतळावर कायम प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसते. प्रवाशांची संख्या वाढत असताना विमानतळ अपुरे पडू लागले आहे. याबद्दल प्रवासी वारंवार तक्रारी करतात. आता हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यातच आगामी काळात फुल बॉडी स्कॅनरच्या बसविल्यानंतर प्रवाशांच्या तपासणीचा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे. सध्या ३० सेकंदांचा असलेला हा कालावधी १५ सेंकंदावर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आणखी वाचा-प्रवांशासाठी खूशखबर! पुणे रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण सुरू
केंद्र सरकारने जुलै महिन्यातच १३१ फुल बॉडी स्कॅनर आणि ६०० हँड बॅगेज स्कॅनर खरेदीसाठी १ हजार कोटी रुपयांची निविदा काढली होती. परंतु, यासाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ही निविदा मागे घेण्यात आली. त्यानंतर मंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यातील चार विमानतळांवर फुल हॉडी स्कॅनर बसविण्याच्या प्रस्तावास मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यात पुणे विमानतळावर ५, कोलकता विमानतळावर १३, चेन्नई विमानतळावर १२ आणि गोवा विमानतळावर ८ फुल बॉडी स्कॅनर बसविण्याचा समावेश आहे. नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभागाच्या वर्गवारीनुसार, ही विमानतळे संवेदनशील मानली जातात.
शरीरात लपविलेली वस्तू शोधता येणार
विमानतळावर बसविण्यात येणारे फुल बॉडी स्कॅनर हे मिलीमीटर लहरींवर आधारित आहेत. शरारीत लपविलेली कोणतीही वस्तू त्यांच्यामुळे शोधता येईल. अनेक तस्कर शरीराच्या आतमध्ये अनेक वेळा वस्तू लपवून तस्करी करतात. अशा तस्करीला भविष्यात आळा बसणार आहे.