पुणे : ‘धुरांच्या रेषा हवेत न काढताही पळती झाडे पाहत झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी’च्या प्रवासाचा आनंद देणाऱ्या बाळगोपाळांच्या लाडक्या ‘फुलराणी’मध्ये बसण्याची आजही भारी मौज वाटते. त्यामुळे बालकांसमवेत पालकही या प्रवासाचा आनंद लुटत बालपणीच्या आठवणींना नव्याने उजाळा देतात. करोना टाळेबंदी आणि क्वचितप्रसंगी देखभाल-दुरुस्तीचा कालखंड वगळता अव्याहतपणे सेवा देणारी ‘फुलराणी’ मंगळवारी (८ एप्रिल) सत्तरीमध्ये पदार्पण करत आहे.
लहान मुलांना वाघ, सिंह, हत्ती, माकड, ससे, नीलगाय अशा प्राणी-पशूंचे असलेले आकर्षण ध्यानात घेऊन पुणे महापालिकेने विकसित केलेल्या पेशवे उद्यानातील ‘फुलराणी’ या छोटेखानी रेल्वेचे उद्घाटन ८ एप्रिल १९५६ रोजी त्या वेळी पूर्वप्राथमिक शाळेत शिकणाऱ्या वसुंधरा डांगे या साडेचार वर्षांच्या मुलीच्या हस्ते झाले होते. मुलांमध्ये रमणारे महर्षी धोंडो केशव कर्वे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या वेळच्या वसुंधरा डांगे या मुलीचा प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या सुगंधा शिरवळकर झाल्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी नातींसमवेत येऊन फुलराणीच्या प्रवासाची मौज अनुभवली होती.
पेशवे उद्यानात मंगळवारी सकाळी ११ वाजता बाळगोपाळांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात केक कापून फुलराणीचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली. सुरुवातीपासून तीन डब्यांची असलेली ‘फुलराणी’ ही रेल्वेची छोटेखानी प्रतिकृती पूर्वी डिझेल इंजिनवर धावत होती. मात्र, काळाची गरज ओळखून आता ती बॅटरीवर धावत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न उद्भवत नाही.
पूर्वी रेल्वेच्या डब्याप्रमाणे असणारी ‘फुलराणी’ आता उघड्या जीपप्रमाणे प्रवासाचा आनंद देते आहे. गेल्या आर्थिक वर्षात लहान आणि मोठे, असे मिळून ८३ हजार ९६ जणांनी ‘फुलराणी’तून प्रवास केला असून, त्याद्वारे १२ लाख ४१ हजार ५५० रुपयांचे उत्पन्न झाले असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.
असेही वर्तुळ पूर्ण
पेशवे उद्यान विकसित झाल्यानंतर हे उद्यान आणि येथील ‘फुलराणी’ पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारीत होती. राज्य शासनाने २०१२ मध्ये येथे ऊर्जा उद्यान विकसित केले. त्यामुळे पुढील सहा वर्षे उद्यानाचा ताबा राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाकडे होता. आता ऊर्जा उद्यान प्रकल्पानंतर पेशवे उद्यानामध्ये साहसी खेळांची साधने विकसित करण्यात आली असून, उद्यानाची आणि ‘फुलराणी’ची जबाबदारी पुन्हा एकदा महापालिकेकडे आली आहे.
‘फुलराणी’च्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात माझ्या नातींसमवेत उपस्थित राहून एखाद्या शाळेला ७५ पुस्तकांची भेट देण्याची योजना होती. या संदर्भात महापालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही. आता पुढच्या वर्षी सत्तरीपूर्तीला तरी हा योग जुळून येईल, अशी अपेक्षा आहे.
वसुंधरा डांगे (सध्याच्या सुगंधा शिरवळकर), फुलराणीच्या उद्घाटक