केंद्रीय अंदाजपत्रकात जवाहरलाल नेहरू योजनेसाठीची तरतूद यंदा दुप्पट करण्यात आल्यामुळे पुण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून भामा-आसखेड धरणातून पाणी पुरवठा, पर्वती येथील जलशुद्धीकरण तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र, वडगाव बुद्रुक येथील जलशुद्धीकरण प्रकल्प यासह पुण्याचे अन्य काही प्रकल्प नेहरू योजनेतून मार्गी लागण्याची शक्यता आहे.
नेहरू योजनेसाठी सन २०१२-१३ च्या केंद्रीय अंदाजत्रकात सात हजार ३८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आगामी आर्थिक वर्षांसाठी ही तरतूद १४ हजार ८७३ कोटी इतकी वाढवण्यात आली आहे. या तरतुदीमधून शहरांमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी १० हजार गाडय़ांची खरेदी होणार असल्यामुळे या तरतुदीचा फायदा पीएमपीलाही मिळू शकेल. पीएमपीला आणखी ५०० गाडय़ांची आवश्यकता असल्यामुळे नेहरू योजनेतून या गाडय़ा उपलब्ध होऊ शकतात.
नेहरू योजनेचा दुसरा टप्पा एप्रिलपासून सुरू होत असल्यामुळे या टप्प्यासाठी पुणे महापालिकेने चार प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर हे प्रकल्प केंद्राकडे गेले असून त्यांचा प्रस्तावित खर्च १,२२७ कोटी इतका आहे. त्यातील ५० टक्के अनुदान केंद्राकडून मिळेल.
या चार प्रकल्पांमध्ये मुख्यत: नगर रस्ता, कळस, खराडी, चंदननगर, धानोरी, टिंगरेनगर, विद्यानगर, वडगावशेरी यासह पुणे शहराच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला ४०० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. धरणातून रोज २०० दशलक्ष लिटर पाणी आणण्याचे नियोजन असून भामा आसखेड येथून पाणी आणण्याबरोबरच पर्वती येथील जलप्रक्रिया प्रकल्प (प्रकल्पीय रक्कम १९६ कोटी), मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (प्रकल्पीय रक्कम ४९० कोटी), वडगाव बुद्रुक येथील नवे जलशुद्धीकरण केंद्र, तसेच वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र (प्रकल्पीय रक्कम १४३ कोटी) या तीन प्रकल्पांनाही राज्य शासनाने मंजुरी दिली असून ते केंद्राकडे नेहरू योजनेच्या अनुदानासाठी सादर करण्यात आले आहेत.
नेहरू योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुणे शहरातील रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदी सुधारणा, बीआरटी, पीएमपीसाठी गाडय़ांची खरेदी, पावसाळी गटार योजना आदी प्रकल्पांना अनुदान मिळाले होते. या प्रकल्पांसाठी दीड हजार कोटी रुपये मंजूर झाले होते. आगामी वर्षांच्या महापालिका अंदाजपत्रकात नेहरू योजनेत २२७ कोटी रुपये महापालिकेने जमा बाजूला दाखवले आहेत.

कृपया चौकट करता येईल

नेहरू योजनेतून पुण्याला काय काय..
– पीएमपीसाठी नव्या गाडय़ा
– भामा-आसखेड येथून पाणी
– पर्वती येथील जलप्रक्रिया प्रकल्प
– वडगाव बुद्रुकचे जलशुद्धीकरण केंद्र