करोना काळात जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सन २०२० मधील जुलै महिन्यातील एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले होते. जमा झालेला निधी करोना संसर्गाच्या अनुषंगाने खर्च करणे, कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्यास किंवा आकस्मित वैद्यकीय उपचारांसाठी खर्च करण्यात येणार होता. या निधीतील साडेपाच लाख रुपये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या १५ वर्षांखालील मुलांसाठी उन्हाळी शिबिर आणि अभ्यास दौऱ्यासाठी खर्च केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा >>>पुणे: नांदण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार ; हडपसर भागातील घटना
जिल्हा परिषदेकडून प्राप्त माहितीनुसार करोना काळात सन २०२० मधील जुलै महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे स्वतंत्र लेखाशिर्षाखाली जमा करण्यात आले. त्यानुसार दोन कोटी ४३ लाख ४९ हजार ५९५ एवढा निधी जमा झाला. त्यापैकी करोनाच्या अनुषंगाने ५० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या करोना व इतर आकस्मिक वैद्यकीय उपचारांसाठी दोन लाखांपर्यंत मदत करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत एक कोटी ७३ लाख १८ हजार ९९४ रुपये खर्च झाला आहे. त्यामध्ये शरद भोजन योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, करोना केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन, टाटा इन्स्टिट्यूट यांच्याकडील विद्यार्थी, जिल्हा परिषदेकडील विविध लेखाविषयक व इतर योजनांची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौरा आणि इतर कारणांसाठी एक कोटी ११ लाख ७९ हजार ७६३ रुपये खर्च करण्यात आले. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या करोना व इतर आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी ५५ लाख ८९ हजार २३१ रुपये खर्च झाला. याशिवाय जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या १५ वर्षांखालील मुलांसाठी कार्यालयाच्या आवारात उन्हाळी शिबिर आणि अभ्यास दौऱ्यासाठी साडेपाच लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. असा एकूण एक कोटी ७३ लाख १८ हजार ९९४ रुपये खर्च करण्यात आले.
दरम्यान, जिल्हा परिषद सेवेत नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेसाठी चार लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा सर्व खर्च वगळता शिल्लक ६६ लाख ३० हजार ६०१ रुपये जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मार्केटयार्ड येथील मोकळ्या जागेत विश्रामगृह बांधण्यासाठी वर्ग करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन महिला फोरम तयार केला आहे. या फोरमकडून चार दिवस सकाळपासून सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांची मुले एकत्र येऊन विविध कार्यक्रम, उपक्रम सभागृहात घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.-जामसिंग गिरासे, महिला व बालविकास अधिकारी