पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढती संख्या व जुन्या पादचारी पुलाची बिकट अवस्था लक्षात घेता स्थानकावर नवा पादचारी पूल बांधण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नव्या पुलासाठी आणखी खर्च लागणार असला, तरी या निधीतून पुलाच्या कामाला सुरुवात होऊ शकणार आहे.
पुणे स्थानकावर मागील काही वर्षांमध्ये प्रवाशांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. गाडय़ांची संख्या वाढली असल्याने विविध फलाटावरून चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. पूर्वीची प्रवासी संख्या व गाडय़ांची संख्या लक्षात घेऊन सर्व फलाटांना जोडणारा सध्याचा मुख्य पादचारी पूल बांधण्यात आला होता. मात्र, हा पूल सध्या प्रवाशांसाठी पुरेसा होत नाही. संध्याकाळी एकाच वेळेला विविध ठिकाणाहून गाडय़ा स्थानकात दाखल होत असताना व त्याच वेळी वेगवेगळ्या गाडय़ा स्थानकावरून सुटणार असल्याने त्या वेळी पादचारी पुलावर पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहात नाही.
जुन्या पुलाची क्षमता व आयुर्मान लक्षात घेता पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानकावर नवा पर्यायी पादचारी पूल असावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, रेल्वे अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी निधीची तरतूद केली जात नव्हती. सुरुवातीला जुन्या पुलाचा विस्तार व मजबुतीकरणाचा विषय समोर आला होता. त्यानुसार पाच ते सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, हा निधीही पुरेसा नव्हता. आता जुन्या पुलाला समांतर नवा पूल उभारण्याचा निर्णय झाला आहे. नव्या पुलासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे महिनाभरात या पुलाचे काम सुरू होऊ शकणार आहे.

स्थानकात आणखी दोन सरकते जिने
 
पुणे स्थानकावरील पादचारी पुलावर जाण्यासाठी सध्या एक सरकता जिना लावण्यात आलेला आहे. मात्र, हा जिना अनेकदा नादुरुस्त झालेला असतो. त्याचप्रमाणे तो वरून खालच्या दिशेने येत असल्याने वर चढण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. रेल्वे अर्थसंकल्पामध्ये देशभरातील विविध स्थानकांवर १७९ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. त्यातील दोन जिने पुणे स्थानकाला देण्यात येणार असून, सध्याच्या जिन्याजवळ एक, तर फलाट क्रमांक दोन व तीनच्या दरम्यान दुसरा जिना बसविण्याचे नियोजन आहे.