पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची चौथ्या फेरीची प्रवेश यादी बुधवारी (२२ जुलै) प्रसिद्ध करण्यात आली असून या फेरीत १ हजार ३८२ विद्यार्थ्यांना नव्याने महाविद्यालय देण्यात आले आहे. आतापर्यंत प्रवेशच न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष फेरीची प्रक्रिया गुरुवारपासून होणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची चौथी प्रवेश यादी बुधवारी जाहीर झाली. या फेरीसाठी जवळपास २२ हजार जागा उपलब्ध होत्या. या फेरीत १ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून एका विद्यार्थ्यांला या फेरीतही कोणतेच महाविद्यालय मिळू शकलेले नाही. या फेरीमध्ये ५ हजार ७५७ विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार वरचे महाविद्यालय (बेटरमेंट) देण्यात येणार आहे. आतापर्यंत अकरावीच्या ४८ हजार ४४७ जागांवर प्रवेश झाले आहेत. या फेरीत प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी गुरुवार (२३ जुलै) आणि शुक्रवार (२४ जुलै) या दोन दिवसांत पूर्ण शुल्क भरून प्रवेश घ्यायचा आहे.
आतापर्यंतच्या फे ऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेले विद्यार्थी, अर्ज न भरलेले विद्यार्थी, महाविद्यालय बदलून हवे असणाऱ्या विद्यार्थिनी यांच्यासाठी विशेष फेरी राबवण्यात येणार असून गुरुवारपासून पाचव्या फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या फेरीसाठी २० हजार ६१८ जागा उपलब्ध असण्याची शक्यता आहे. या फेरीनंतर कोणतीही फेरी होणार नाही.
चौथ्या फेरीत महाविद्यालय बदलण्यासाठी
चौथ्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार वरचे महाविद्यालय (बेटरमेंट) मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलायचे असेल, तर त्यांनी आधीच्या महाविद्यालयांतील प्रवेश रद्द करणे आवश्यक आहे. आधीच्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द होताना विद्यार्थ्यांना २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यांनतर शुक्रवापर्यंत विद्यार्थ्यांनी नव्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा आहे.
पाचवी फेरी कुणासाठी?
ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीचा प्रवेश अर्जच भरलेला नाही, अर्धवट अर्ज भरल्यामुळे प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेले विद्यार्थी, आतापर्यंतच्या फे ऱ्यांमध्ये महाविद्यालय मिळूनही प्रवेश मिळालेला नाही, ज्या विद्यार्थ्यांना माध्यम बदलायचे आहे किंवा दूरचे महाविद्यालय मिळाल्यामुळे ते बदलायचे आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांमध्ये पुनर्तपासणीमध्ये बदल झाला आहे.
पाचवी फेरी कशी असेल?
या फेरीसाठी नव्याने अर्ज करायचा आहे. आतापर्यंत अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका विकत घेऊन नव्याने अर्ज भरायचा आहे. कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयात शनिवापर्यंत (२५ जुलै) माहिती पुस्तिका मिळणार आहेत. यापूर्वी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग म्हणजे महाविद्यालयांचे पर्याय नव्याने भरायचे आहेत. महाविद्यालयांतील रिक्त जागा, मिळालेले गुण आणि घरापासूनचे अंतर यानुसार अर्ज भरायचे आहेत. शुक्रवारी (२४ जुलै) पाचव्या फेरीसाठी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील जाहीर होणार आहे. त्यानंतर २७ ते २९ जुलै या कालावधीत अर्ज भरायचे आहेत. ३१ जुलैला आलेल्या अर्जानुसार गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. ३१ जुलै आणि १ ऑगस्ट या दिवशी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचे आहेत.
नव्याने अर्ज भरण्यासाठी..
नव्याने अर्ज भरणाऱ्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी स.प. महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, फग्र्युसन महाविद्यालय, हडपसर येथील साधना महाविद्यालय आणि पिंपरी येथील जयहिंद महाविद्यालयांत पडताळणी केंद्र असणार आहेत. इतर शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयांत पडताळणी केंद्र असेल.
महाविद्यालयांची तपासणी होणार..
अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली की शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्रवेशाची केंद्रीय प्रवेश समिती आणि शिक्षण विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची पडताळी करण्यासाठी महाविद्यालयांना बायोमेट्रिक हजेरीही बंधनकारक करण्याचे शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या सुधारणा आहेत का याचीही पाहणी करण्यात येणार असून सध्या चार महाविद्यालयांबाबत पुरेशा सुविधा नसल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या आहेत.
नगरसेवक आणि संघटनांना उपसंचालकांकडून पायघडय़ा
दूरचे महाविद्यालय मिळाले, प्रवेशच मिळाला नाही अशा तक्रारी घेऊन पालक केंद्रीय समितीच्या कार्यालयात गर्दी करत आहेत. मात्र, विभागीय उपसंचालक सध्या प्रवेश करून देणारे काही नगरसेवक आणि संघटनांच्या प्रतिनिधींच्या कौतुकातच दंग आहेत. ‘प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रार घेऊन आलेल्या पालकांनी रांगेत उभे राहा मात्र, नगरसेवकांनी रांगेत उभे राहण्याची गरज नाही..’ असे उपसंचालकच जाहीर करत असल्यामुळे प्रामाणिकपणे प्रवेश मिळवण्यासाठी धडपडणारे पालक हतबल झाले आहेत.

Story img Loader