महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या ७२५ गीतांच्या एमपी-थ्री खजिन्यासह गदिमा संकेतस्थळ आता नव्या स्वरूपात उपलब्ध झाले आहे. http://www.gadima.com, http://www.madgulkar.com, http://www.geetramayan.com या तीन नावांनी संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले असून त्यासाठी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर आणि नातसून प्राजक्ता माडगूळकर यांनी पुढाकार घेतला आहे.
‘खेडय़ामधले घर कौलारु’, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’, ‘इंद्रायणी काठी’, ‘एक धागा सुखाचा’, ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘नाच रे मोरा’, ‘एका तळ्यात होती’, ‘जिंकू किंवा मरू’ अशी गदिमांची असंख्य गाणी शब्दांसह एमपी-थ्री रूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गदिमांची चित्रपटगीते, बालगीते, लावण्या, भक्तिगीते, देशभक्तिपर गीते, सवाल-जबाब आणि अन्य गीते अशा वेगवेगळ्या स्वरूपात विभागणी करण्यात आली आहे. २०१४-१५ हे गीतरामायणाचे हीरकमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त संस्कृत गीतरामायण ध्वनिस्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुधीर फडके यांच्या आवाजातील गीतरामायणाची ५६ गीते, त्याचप्रमाणे माणिक वर्मा, लता मंगेशकर, सुधीर फडके, ललिता फडके अशा गायकांच्या स्वरातील ५६ गीतांचा समावेश आहे. गीतरामायणासंबंधीच्या आठवणी आणि नव्या पिढीसाठी गीतरामायण अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. कृष्णचरित्रावर आधारित ‘गीतगोपाल’ची सी. रामचंद्र आणि यशवंत देव या दोन संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली गीतेसुद्धा या संकेतस्थळावर आहेत.
‘जोगिया’, ‘जत्रेच्या रात्री’, ‘पूजास्थान’ या गदिमांच्या आवाजातील कवितांसह ‘मी कवी कसा झालो’ हे गदिमांचे कथन संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे. गदिमांच्या साहित्य विभागात कारकीर्द, साहित्य सूची, चित्रपट सूची, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची सूची, गदिमांची वंशावळ आणि गदिमा प्रतिष्ठानची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. गदिमांची ३०० छायाचित्रे, सुलेखनकार भालचंद्र लिमये यांनी गदिमांच्या निवडक २० गीतांवर केलेली चित्रलिपी संकेतस्थळावर पाहता येणार असल्याचे सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले.