पुणे : ‘जी २०’ ही जगातील प्रगत देशांची संघटना असून, या संघटनेचे २०२३ या वर्षांसाठीचे यजमान पद भारताकडे आले आहे. पुढील वर्षभरात ‘जी २०’ च्या संबंधित विविध बैठका होणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या न्याहारीत भरडधान्य, तृणधान्यांपासून तयार केलेल्या पदार्थाचा समावेश असणार आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रल्हाद सिंह पटेल यांचा नुकतेच पुणे दौरा झाला. त्या वेळी ते म्हणाले, ‘जी २०’ संघटनेचे यजमान पद मिळाले आहे. देशात पुढील वर्षभर ‘जी २०’ संबंधित विविध बैठका, परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. सुमारे २१३ बैठका होणार असून, बैठकांसाठी जगातील प्रगत २० देशांचे राष्ट्र प्रमुख, अर्थमंत्री, संबंधित देशांच्या मुख्य बँकेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकांसाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या दैनदिन न्याहारीत तृणधान्ये, भरडधान्यांपासून तयार केलेल्या पदार्थाचा समावेश करण्यात येणार आहे. परदेशी पाहुणे ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत, त्यांच्यासाठी विशेष सूचनाही देण्यात आली आहे.’

महाराष्ट्रात तेरा बैठका

‘जी २०’ संघटनेच्या २०२३ मध्ये देशात होणाऱ्या २१३ बैठकींपैकी महाराष्ट्रात १३ बैठका होणार आहेत. मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या तीन शहरांमध्ये या बैठका होणार आहेत. त्या बाबत नुकतेच एका केंद्रीय पथकाने पुण्याला भेट देऊन परिषदेच्या दृष्टीने सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे.

राज्यनिहाय वेगवेगळे पदार्थ

तृणधान्यांची लागवड प्रत्येक राज्यांच्या दुर्गम, डोंगरी भागात होते. त्यानुसार राज्यनिहाय उत्पादित होणारे तृणधान्य ही वेगवेगळी आहेत. ‘जी २०’च्या बैठका ज्या राज्यात होणार आहेत, त्या राज्यात उत्पादित होणाऱ्या तृणधान्यांपासून पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे खाद्यपदार्थ परदेशी पाहुण्यांच्या न्याहारीसाठी तयार करण्यात यावेत, असेही दिशानिर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

तृणधान्यांच्या न्याहारीचा बेत का?

तृणधान्यांची लागवड वाढावी, तृणधान्यांचा आहारात समावेश व्हावा, यासाठी २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य (मिलेट) वर्ष साजरे करावे, असा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रात ठेवला होता. त्या जगातील ७१ देशांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे पुढील वर्ष जागतिक पातळीवर तृणधान्य वर्षे म्हणून साजरे केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जी-२० च्या पाहुण्यांसाठी तृणधान्यांपासून तयार केलेल्या खाद्य पदार्थाचा न्याहारीत समावेश करण्याचा बेत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G20 guests breakfast will include food made from cereals and whole grains zws