जीएंचे साहित्य हे एखाद्या अनवट रागासारखे आहे. शास्त्र समजत नसले तरी त्याचा पुरेपूर आनंद मिळतो आणि तो दीर्घकाळ टिकतो. जीएंच्या कथा वाचताना माझी मनोवस्था तशीच झाली. नाटक, चित्रपट, एकांकिका, अभिवाचन अशा माध्यमांतरामुळे जीएंच्या कथांना नवे आयाम प्राप्त झाले, असे मत ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांनी रविवारी व्यक्त केले.
जी. ए. कुलकर्णी कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अक्षरधारा बुक गॅलरी आयोजित प्रतिभावंत कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘जीएं’च्या कथेतील स्त्री व्यक्तिरेखांवर केलेल्या विशेष अभ्यासाबद्दल डॉ. वीणा देव यांचा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी देव बोलत होत्या. जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर, जीएंचे विद्यार्थी चंद्रशेखर चिकमठ, स्टोरी टेलचे प्रसाद मिरासदार, डाॅ. संजीव कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
डॉ. देव म्हणाल्या, जीएंच्या साहित्याभोवती असलेले गूढतेचे वलय स्वीकारून त्याचे विविध अंगाने सादरीकरण करणे हे त्या त्या क्षेत्रातील कलाकारांना आव्हानात्मक तर होतेच. परंतु, जीएंना समजून घेण्याचाही तो एक प्रवास होता.चिकमठ यांनी आपल्या मनोगतातून प्राध्यापक जीएंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. जीएंच्या ‘पराभव’ या कथेवर आधारित हैदराबाद येथील भावतरंग संस्थेतर्फे विजय नाईक लिखित व दिग्दर्शित एकांकिकेचे सादरीकरण झाले.