‘गानवर्धन’ संस्थेचे संगीत संवर्धनाचे मोलाचे कार्य; हक्काच्या व्यासपीठासाठी अर्थसाह्य़ाची अपेक्षा
अभिजात संगीताचे जतन आणि संवर्धन या क्षेत्रात गेल्या तीन तपांहून अधिककाळ मोलाचे कार्य करीत असलेल्या ‘गानवर्धन’ या संस्थेने स्वत:चे हक्काचे व्यासपीठ साकारण्याबरोबरच संगीताच्या जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण संकल्प केले आहेत. या विविध संकल्पांची पूर्ती करण्यासाठी संस्थेला समाजातील दानशुरांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना आणि कलापरिपूर्णतेच्या सीमेवर असलेल्या कलाकारांना हक्काचे आणि प्रायोगिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशातून संगीत रसिक असलेल्या कृष्णा गोपाल ऊर्फ कृ. गो. धर्माधिकारी यांनी ८ नोव्हेंबर १९७८ रोजी ‘गानवर्धन’ या संस्थेची स्थापना केली. संगीतामध्ये कला सादरीकरणाबरोबरच संगीत साधकांच्या वैचारिकतेमध्ये प्रगल्भता यावी या उद्देशातून मैफलीपलीकडे जाऊन संगीताच्या विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशातून संस्थेने सप्रयोग व्याख्यानांचा अंतर्भाव असलेला ‘मुक्त संगीत चर्चासत्र’ हा उपक्रम १९८२ मध्ये सुरू केला. संस्थेच्या वाटचालीमध्ये गेल्या ३८ वर्षांत बाराशेहून अधिक कलाकारांनी ‘गानवर्धन’च्या स्वरमंचावरून आपली कला सादर केली आहे. या चर्चासत्रात व्यक्त झालेल्या ज्येष्ठ कलाकारांच्या सांगीतिक विचारमंथनावर आधारित ‘मुक्त संगीत संवाद’ हा ग्रंथ मराठी, हिंदूी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये सिद्ध केला आहे.
आधुनिकतेची कास धरत संस्थेने आता नव्या काळाशी जुळवून घेण्याचा संकल्प केला आहे. ‘गानवर्धन’च्या व्यासपीठावरील गेल्या ३८ वर्षांतील संगीत सभांच्या ध्वनिफिती संस्थेकडे उपलब्ध आहेत. या सर्वाचे डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जतन करण्याचे काम संस्थेला सुरू करावयाचे आहे. सुमारे दोन हजार तासांहून अधिक तासांचे हे ऑडिओ-व्हिडिओ ध्वनिमुद्रण नव्या पद्धतीमध्ये आणून अभिजात संगीतातील महत्त्वपूर्ण असा दस्तावेज संगीत अभ्यासक आणि रसिकांना उपलब्ध करून द्यावयाचा आहे. मुक्त संगीत चर्चासत्रातील शंभरहून अधिक मान्यवरांच्या विचारांपैकी केवळ ४५ लेखांचा समावेश असलेला ग्रंथ प्रकाशित झाला आहे. उर्वरित सर्व लेखांचा समावेश असलेले पुढील भाग मराठी, हिंदूी आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित करावयाचे आहेत. दुर्मीळ छायाचित्रांचे फोटोबायोग्राफीच्या माध्यमातून जतन करावयाचा मानस आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून संस्थेचे कार्य आणि उपक्रम सर्वदूर पोहोचविण्याबरोबरच हक्काचे व्यासपीठ म्हणून स्वत:चे सभागृह बांधण्याचाही विचार सुरू आहे. संगीत अभ्यासक आणि डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा कार्यशाळा आणि मुलांना लहान वयात संगीताची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस असून त्यासाठी संस्थेला निधीची आवश्यकता आहे, अशी माहिती प्रसाद भडसावळे यांनी दिली.