अरे आवाज कुणाचा’च्या घोषणाबाजीमध्ये मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाची ‘गाभारा’ एकांकिका ‘भरत’ करंडकाची मानकरी ठरली. भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे आयोजित स्पर्धेत कलादर्शन, पुणे संस्थेच्या ‘यशोदा’ एकांकिकेस द्वितीय तर रेवण एंटरटेन्मेंटच्या ‘असा ही एक कलावंत’ या एकांकिकेस तृतीय पारितोषिक देण्यात आले.
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे भरत करंडक एकांकिका स्पर्धेतील विजेत्या संघांना ज्येष्ठ अभिनेते स्वरूप कुमार यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे, प्रदीप रत्नपारखी, प्रतिभा दाते, कार्याध्यक्ष अभय जबडे, कार्यवाह आणि स्पर्धेचे परीक्षक संजय डोळे, अश्विनी अंबिके, चंद्रशेखर भागवत या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा : पुणे : राज्य शिक्षक पुरस्कारांचा शिक्षण विभागाला विसर?
संस्थेच्या नाटकांतून पुढे आलेला बालकलाकार अर्णव पुजारी, नृत्यांगना भाग्यश्री कुलकर्णी, गायिका-अभिनेत्री अनुष्का आपटे, चारूलता पाटणकर, ऑर्गनवादक राहुल गोळे, लेखक-दिग्दर्शक व अभिनेते संजय डोळे यांचा सत्कार करण्यात आला. कचरावेचकांच्या मुलांसाठी कार्यरत असलेल्या सासवडजवळील सार्थक संस्थेला अर्थसाह्य करण्यात आले. तसेच, वरदा इनामदार, सृष्टी नागवंशी, सान्वी घोलप या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.