पुणे : राज्यात कीटकजन्य आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यंदा जानेवारी ते ७ मे या कालावधीत हिवतापाचे ३ हजार ६२ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण मुंबई आणि गडचिरोली जिल्ह्यातील आहे. यामुळे आरोग्य विभागाने या ठिकाणची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आता पावले उचलली आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदा राज्यात जानेवारी ते ७ मे या कालावधीत हिवतापाचे ३ हजार ६२ रुग्ण आढळले. यापैकी मुंबईत सर्वाधिक १ हजार ३२४ रुग्ण तर गडचिरोली जिल्ह्यात १ हजार १४२ रुग्णांची नोंद झाली आहे. या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. राज्यात गेल्या वर्षी जानेवारी ते ७ मे या कालावधीत हिवतापाचे २ हजार २३० रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रुग्णांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचा – पुणे शहरातील नाल्यांची सफाई आठ दिवसात न झाल्यास तीव्र आंदोलन करणार : सुप्रिया सुळे
पावसाळा सुरू झाल्याने आगामी काळात हिवतापाचे रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्हा हा हिवतापासाठी अतिशय संवेदनशील आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ३६ टक्के रुग्ण गडचिरोलीत आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कीटकजन्य आजारांचा आढावा घेतला. त्यातही हे आजार वाढत असल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने मुंबई महापालिका आणि गडचिरोली जिल्हा परिषद यांना तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
हेही वाचा – राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची खिचडीपासून सुटका; पोषण आहारातील आता १५ पाककृती कोणत्या?
हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण
जिल्हा : रुग्ण
– मुंबई : १,३२४
– गडचिरोली : १,१४२
– चंद्रपूर : १३०
– पनवेल : १०५
– रायगड : ६८
– ठाणे : ५६
– कल्याण : ५०
– गोंदिया : २१
– नवी मुंबई : १६
– अमरावती : १२
– सातारा : १०
– सिंधुदुर्ग : १०
राज्यात मुंबई आणि गडचिरोलीत यंदा हिवतापाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेथील स्थितीवर आमचे बारकाईने लक्ष आहे. – डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य विभाग