गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव यांना विद्याताई माडगूळकर स्मृती ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, कथा-पटकथालेखक आणि गीतकार गजेंद्र अहिरे यांना ‘चैत्रबन’ पुरस्कार आणि युवा गायिका बेला शेंडे यांना ‘विद्या प्राज्ञ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शालान्त परीक्षेत मराठी विषयात शंभर गुण संपादन करणाऱ्या जठार पेठ (जि. अकोला) येथील बाल शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या मंगलसिंग पाकळ याला गदिमा पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. अडीच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गदिमा यांच्या ३८ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १४ डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्तरार्धात स्वरानंद प्रतिष्ठानचे कलाकार ‘रिमझिम स्वरांची’ हा सुमन कल्याणपूर यांच्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर आणि कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी मंगळवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadima award to suman kalyanpur