‘ज्ञानियाचा वा तुक्याचा हाच माझा वंश आहे, माझिया रक्तात काही ईश्वराचा अंश आहे’ असे म्हणणारे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच ‘गदिमा’ यांचे साहित्य मराठीप्रेमींसाठी माहितीच्या मायाजालावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. गदिमांच्या दुर्मिळ पुस्तकांचा संच आता www.gadima.com या संकेतस्थळावरून जगभरातील वाचकांसाठी खुले झाले आहे.
मराठी राजभाषा दिन आणि ‘गीतरामायणा’चा हीरकमहोत्सव असे दुहेरी औचित्य साधून गदिमाप्रेमींसाठी हा अमूल्य ठेवा आता घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गदिमांचा नातू आणि गदिमा डॉट कॉम या मराठीतील पहिल्या साहित्यिक संकेतस्थळाचे संस्थापक सुमित्र माडगूळकर व नातसून प्राजक्ता माडगूळकर यांनी गदिमांचे हे साहित्य इंटरनेटवर आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी त्यांना औरंगाबाद येथील साकेत प्रकाशन आणि पुण्यातील अनुबंध प्रकाशनचे सहकार्य लाभले आहे.
गदिमांचे ‘बांधावरच्या बाभळी’, ‘कृष्णाची करंगळी’, ‘थोरली पाती’, ‘सोने आणि माती’ ‘तीन चित्र-कथा’, ‘बोलका शंख’, ‘चंदनी उदबत्ती’, ‘भाताचे फूल’, ‘वेग आणि इतर कथा’ हे कथासंग्रह, ‘पूरिया’ आणि ‘वैशाखी’ हे कवितासंग्रह आणि ‘नाच रे मोरा’ हा बालगीतसंग्रह अशा १३ पुस्तकांचा संग्रह या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. वाचक त्यांच्या आवडीची पुस्तके या संकेतस्थळाद्वारे मागणी नोंदवून घरपोच मिळवू शकतात, अशी माहिती प्राजक्ता माडगूळकर यांनी दिली.
‘गीतरामायण’ साठीत
गदिमांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेले सुधीर फडके यांच्या स्वरातील ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती कुश-लव रामायण गाती’ हे ‘गीतरामायणा’चे पहिले गीत १ एप्रिल १९५५ रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित झाले होते. रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे गदिमा आणि बाबूजी यांच्या प्रतिभेचे लेणे असलेले ‘गीतरामायण’ यंदा हीरकमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. १९५५ मध्ये लीप वर्ष असल्याने ५४ गीतांची मालिका रसिकांना ऐकता आली. त्या काळी उदबत्तीच्या सुवासिक दरवळामध्ये रेडिओचे पूजन करीत गीतरामायण ऐकले जात होते. सहा दशके झाली तरी या गीतरामायणाची गोडी अजूनही अवीट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा