शिवसेनेचे मावळचे विद्यमान खासदार गजानन बाबर यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याच्या चर्चेने पक्षवर्तुळात जोर धरला असतानाच कोणत्याही परिस्थितीत खासदारकीचा दावा न सोडण्याच्या मन:स्थितीत असलेल्या बाबर व त्यांच्या समर्थकांनी रविवारी वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. संभाव्य प्रतिस्पर्धी मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हजेरीने सर्वाच्याच भुवया उंचावल्या.
आकुर्डीतील उर्दू शाळेच्या प्रांगणात आयोजित स्नेहमेळाव्यात बाबर यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. रात्री आठच्या सुमारास बाबरांनी केक कापला, तेव्हा आमदार जगताप, माजी महापौर तात्या कदम, रंगनाथ फुगे, नगरसेवक सीमा सावळे आदी उपस्थित होते. जगतापांच्या उपस्थितीने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याशिवाय, इतक्या मोठय़ा प्रमाणात बाबरांनी यापूर्वी वाढदिवस केला नाही. आताच कधी नव्हे त्यांनी अशाप्रकारे स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. तीनदा नगरसेवक, दोनदा आमदार, जिल्हाप्रमुख व खासदार या क्रमाने राजकीय प्रवास करणाऱ्या बाबरांना आगामी निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याचे संकेत आहेत. बाबरांची लोकप्रियता कायम वाटत असली, तरी त्यांचे वाढते वय हे कारण पुढे करण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटनेते श्रीरंग बारणे यांना हिरवा कंदील दिल्याचे बोलले जाते. या चर्चेने बाबर समर्थक अस्वस्थ आहेत. कोणत्याही परिस्थितीत खासदारकीचा दावा सोडण्याच्या मन:स्थितीत बाबर नाहीत. त्यामुळेच त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे सांगण्यात येते.

Story img Loader