महाराष्ट्राचे विचारविश्व गांधी, फुले, आंबेडकर यांच्यामध्येच अडकले आहे. याच्या बाहेर जाऊन आपल्या चर्चेमध्ये आर्थिक प्रश्नांचा अभाव दिसतो, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन खातू यांनी मंगळवारी व्यक्त केले. कोणत्याही प्रश्नाकडे आर्थिक बाबीतून उत्तर शोधण्याऐवजी केवळ उजव्या आणि जातीयवादी विचारांवर टीका करत राहण्यामध्येच वेळ खर्च होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा >>>पुणे : पुरंदर विमानतळ परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव ! ; जमिनी खरेदी-विक्रीला बंदी नसल्याने करोडोंची उलाढाल
राजहंस पुस्तक पेठ आणि राजहंस प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध कवयित्री आणि कथाकार नीरजा लिखित ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ या कादंबरीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना खातू बोलत होते. समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, युवराज मोहिते, राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे आणि संजय भास्कर जोशी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पुणे : २०१४ नंतर ‘आयुष’ जगभरात ; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मत
सासणे म्हणाले, सर्वसामान्य माणूस राजकारणाच्या विळख्यात सापडला असून कला विभाजित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजामध्ये भय निर्माण झाले आहे. संमेलनाध्यक्षाच्या भाषणातून या विषयावर मी बोललो तेव्हा राजकीय सामाजिक भाष्य करण्याची आवश्यकता काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला गेला. पण, भूमिका घेत लेखकाने समाजातील प्रश्नांवर बोलले पाहिजे. त्यासाठी चिंतनशील लेखकाला तारक अशा कल्याणकारी विचारांकडे जावे लागेल.नीरजा म्हणाल्या, अस्वस्थता, निरर्थकता आणि हतबलता यातून ही कादंबरी जन्माला आली. एकमेकांच्या विचारांचा आदर करणारी माणसे २०१४ नंतर दोन गटांत विभागली गेली. समाजामध्ये अस्वस्थता होती. साहित्यिकांकडून पुरस्कार परत करण्यात आले. दक्षिणायन चळवळ आली. शब्दांची हिंसकता जाणवू लागली. असे वातावरण पूर्वी नव्हते. राजकारण पाहता हतबलता आली आहे. या साऱ्यांतून मार्ग काढण्यासाठी साने गुरुजींच्या मानवतेची नितांत गरज आहे.
हेही वाचा >>>पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
माझ्या ‘वेणा’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात ‘या मुलीकडे ऐवज खूप आहे. तिने कादंबरीकडे वळावे,’ असे मत विजय तेंडुलकर यांनी व्यक्त केले होते. त्यांची ती इच्छा फळाला आली याचा आनंद झाला, अशी भावना नीरजा यांनी व्यक्त केली. माझ्यावर शब्दांचे संस्कार करणारे बाबा (ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील) या कार्यक्रमाला असायला हवे होते. त्यांच्याआधी मला दमाणी पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी ‘आधी कविता जन्माला येते मग समीक्षा,’ असे मी त्यांना सांगितले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.