मतदार याद्यांवर काम करा, नोंदणी करा, घरोघरी संपर्क ठेवा, हजारीप्रमुख नेमा, गटबाजी करू नका, नवा-जुना वाद घालू नका, पक्षाचे नुकसान होईल, असे वागू नका असे बजावून सांगतानाच व्यवस्थित काम न केल्यास पदे काढून घेण्यात येतील, असा सज्जड इशारा शिवसेनेचे संपर्कनेते गजानन कीर्तिकर यांनी भोसरीत बोलताना दिला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुखपदाची नव्याने जबाबदारी घेतलेल्या कीर्तिकर यांनी सेना पदाधिकाऱ्यांची भोसरीत बैठक घेतली. दीड तास चाललेल्या या बैठकीत कीर्तिकरांनी उपस्थितांची ‘हजेरी’च घेतली. जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, उमेश चांदगुडे, सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, नगरसेवक सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, अजय सायकर, संगीता पवार, उपशहरप्रमुख विजय फुगे, नंदू दाभाडे आदी उपस्थित होते. या वेळी कीर्तिकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. निवडणुकीत उमेदवार कोणीही असो, शिवसैनिकांच्या जोरावर निवडणूक लढवली जाणार आहे. पक्ष म्हणून निवडणुकांना सामोरे जा, लोकांच्या समस्या समजावून घ्या, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभेचे उमेदवार सक्षम असल्याने त्यांची काळजी नाही. विधानसभेच्या जिल्ह्य़ातील १२ पैकी ६ जागा निवडून आणण्याचा निर्धार कीर्तिकर यांनी या वेळी व्यक्त केला. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊ, असे ते म्हणाले.
 भोसरीकडे सर्वाधिक लक्ष
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भोसरीतील उमेदवार सुलभा उबाळे यांचा १२०० मतांनी पराभव झाला. तेव्हापासून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रारंभी शैलेश परब यांना संपर्कप्रमुख नियुक्त करण्यात आले. जिल्हाप्रमुख मच्छिंद्र दराडे यांनाही लक्ष देण्यास सांगण्यात आले. खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या मतदारसंघातील भाग असल्याने त्यांना जबाबदारी देण्यात आली. आता संभाव्यजिंकू शकणाऱ्या जागांमध्ये शिवसेनेने भोसरीचा समावेश केल्याचे गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajanan kirtikar guided shiv sainiks for coming election
Show comments