उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी मावळ-शिरूरमध्ये तळ ठोकून उपयोग नाही. धमक असल्यास त्यांनीच निवडणूक लढवून दाखवावी, त्यांना तर बारामतीसुद्धा सोपी नाही, असे आव्हान शिवसेनेचे संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर यांनी दिले आहे. अजितदादा दुसऱ्या पक्षातील महिलांवर अन्यायाचा मुद्दा मांडतात. त्यांच्याच पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांना पुण्यात अजितदादांनीच एकाकी पाडले, रडकुंडीला आणले. खासदार सुप्रिया सुळे यांना अजितदादांच्या परवानगीशिवाय पिंपरी-चिंचवडमध्ये येता येत नाही, अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांनी उद्धव ठाकरेंवर कडवट टीका केली. शिवसेना म्हणजे ‘जय भवानी आणि टाक खंडणी’ असून ठाकरे ‘कुचकामी’ नेतृत्व आहे. त्यांच्यात लढण्याची धमक नाही. त्यांच्यामुळेच अनेकांनी पक्ष सोडला. मनोहर जोशींना पक्षात किंमत नाही. महिलांना वाईट वागणूक मिळते, खासदार आदित्य ठाकरेच्या पाया पडतात, असे खोचक मुद्दे मांडताना खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावरही हल्लाबोल केला होता. त्यास कीर्तिकरांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, नगरसेविका सुलभा उबाळे उपस्थित होते.
कीर्तिकर म्हणाले. राष्ट्रवादी बुचकळ्यात असून अजितदादा स्वत:च्या अकलेचे तारे तोडत आहेत. दुसऱ्याच्या पक्षात डोकावण्यापेक्षा त्यांनी राष्ट्रवादीत पाहावे. वंदना चव्हाणांना बीडीपीच्या मुद्दय़ावर एकाकी पाडून त्यांनीच रडायला भाग पाडले. सुळेंना अजितदादांच्या ‘मुलखात’ जाता येत नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षातील महिलांच्या मान-सन्मानाची चिंता करू नये. विरोधकांची टिंगल उडवणे ही अजितदादांची जुनी खोड आहे. अजितदादांची टगेगिरी आणि सिंचन घोटाळा जनता विसरलेली नाही. दुष्काळी परिस्थितीत त्यांनी इंदापुरात केलेले विधान अजून सर्वाच्या स्मरणात आहे. शिवसेनेचा पक्षप्रमुख निवडणूक लढत नाही, ही परंपरा आहे. अजितदादांमध्ये धमक असल्यास त्यांनी इतर मंत्र्यांप्रमाणे निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान कीर्तिकर यांनी दिले.

Story img Loader