फिल्म इन्स्टिटय़ूटच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाची पहिली बैठक गुरुवारी सकाळी होणार असून नियुक्तीपासूनच वादात सापडलेले संचालक मंडळाचे अध्यक्ष अभिनेते गजेंद्र चौहान या निमित्ताने प्रथमच संस्थेला भेट देणार आहेत. संप संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या विरोधाचे वादळ शमले नसल्यामुळे चौहान यांची ही पहिली एफटीआयआय भेट कडेकोट बंदोबस्तात होण्याची चिन्हे आहेत.
चौहान यांच्या नियुक्तीसह संचालक मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या अनघा घैसास, राहुल सोलापूरकर, नरेंद्र पाठक, शैलेश गुप्ता यांना विरोध करत संस्थेतील विद्यार्थ्यांनी जूनमध्ये पुकारलेला संप १३९ दिवस सुरू होता. ‘या व्यक्ती अक्षम असून त्यांच्या नियुक्तया राजकीय हेतूतून झाल्या आहेत,’ असा मुद्दा मांडून आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. संपावर तोडगा न निघताच तो मागे घ्यावा लागल्यामुळे विद्यार्थी नाराज असून निषेध नोंदवणे सुरूच ठेवणार असल्याचे एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने जाहीर केले आहे. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचा एफटीआयआय सोसायटीत समावेश असण्यालाही विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.
यापूर्वी संपकाळात एफटीआयआयच्या १७ आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. ‘७ व ८ जानेवारीला चौहान व संस्थेच्या संचालक मंडळाचे इतर सदस्य संस्थेस भेट देणार असून या काळात विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर कृत्य घडले तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल,’ अशी नोटीस या डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी या विद्यार्थ्यांना बुधवारी बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा