शेतकऱ्याचे कर्ज वाढतेच कसे. हे कर्ज फेडताना नेमके कुठे चुकते.. उपलब्ध असलेले स्रोत, भांडवल या आधारे शेतकरी शेती कशी सांभाळतो आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घर कसे चालवतो. याची झलक आता कॉम्प्युटर गेमच्या माध्यमातून मिळणार आहे. नीति सोल्यूशन्स या ‘चक्र व्ह्य़ू’ या शेतीवर आधारित खेळाची निर्मिती केली आहे.
शेती या विषयावरचे कॉम्प्युटरवरील किंवा सोशल नेटवर्किंग साइट्सवरील खेळ हे काही नवे आता नवे नाहीत. मात्र, आतापर्यंत आलेल्या खेळांचे भारतीय वातावरणाशी साधम्र्य नव्हते. मात्र आता चक्र व्ह्य़ू या खेळाच्या माध्यमातून भारतीय शेतीच्या अर्थकारणाची झलक मिळते. शेती, भारतातील हवामानानुसार आणि भौगोलिक स्थितीनुसार या सगळ्याला तोंड देत शेती करण्याचे धडे या खेळातून मिळतात. शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न, घरातील सदस्यांची आजारपणे अशा वेगवेगळ्या अडचणी शेतक ऱ्यासमोर उभ्या राहतात. त्या दूर करतानाच कर्ज सांभाळत अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचे आव्हान शेतकऱ्याला पेलायचे असते.
भारतात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत जागृती व्हावी. शेती करण्यामधील आव्हाने मुलांना कळावीत या उद्देशाने या खेळाची निर्मिती करण्यात आली आहे. शेतक ऱ्याच्या एकूण अर्थकारणाचा अभ्यास करून या खेळाची निर्मिती करण्यात आली असल्याचे नीति सोल्यूशन्सचे पराग माणकीकर यांनी सांगितले.
खेळ कसा खेळायचा?
या खेळात खेळाडू शेतकरी असेल. प्रत्येक शेतकऱ्याचे कुटुंब असेल. खेळाच्या सुरुवातीला प्रत्येक शेतकऱ्याला काही एकर जमीन दिली जाईल. प्रत्येक एकरामागे १ हजार रुपये अशी प्राथमिक रक्कम प्रत्येक खेळाडूला दिली जाईल. हाती असलेल्या रकमेपेक्षा जेवढय़ा रकमेची गरज भासेल, तेवढी रक्कम शेतकऱ्याला कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाईल. शेतकऱ्याला ज्वारी, सोयाबीन, कापूस आणि कीटकनाशकांसह कापूस या चार पिकांपैकी पिके घेता येतील. पिकाची निवड केल्यानंतर घेतलेले कर्ज, लागवडीसाठी येणारा खर्च अशा जबाबदाऱ्या समोर येतील. त्याच वेळी हवामान, रोग, कीड याचेही तपशील मिळतील. सर्व परिस्थितीनुसार नेमके किती उत्पन्न मिळेल आणि नंतर कर्जाची स्थिती काय असेल, याचे तपशील संगणकाकडून मिळतील. शेती करत असतानाच खेळाडूला त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही सांभाळायच्या आहेत. मुलीचे लग्न, घरातील माणसांची आजारपणे त्याचा खर्च या सर्वाचा ताळमेळ राखून आपले कर्ज हे मर्यादेत ठेवायचे आहे. इतर खेळांमध्ये जशा खेळाच्या पायऱ्या असतात, तसे या खेळात वर्ष आहे. वर्षभरात सर्व ताळमेळ राखत आपले कर्ज मर्यादेत ठेवणे हे खेळाडूपुढील आव्हान असेल. खेळाडूने कर्जाची मर्यादा ओलांडली की शेतकरी आत्महत्या करणार. दिलेल्या मर्यादेत कर्ज राखून शेतकऱ्याला वाचवणे हा खेळाचा मुख्य भाग आहे.
http://www.realfarmer.in या संकेतस्थळावर या खेळाची अधिक माहिती उपलब्ध आहे.

Story img Loader