शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तसेच व्यंगचित्र कलादालनासाठी गरवारे बालभवनची जागा घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू करण्यात आल्यामुळे स्मारकाच्या जागेचा वाद सुरू झाला आहे. स्मारकाला आमचा विरोध नाही, मात्र स्मारकासाठी मुलांच्या खेळण्याची जागा हिरावून घेऊ नये, अशी मागणी शेकडो मुलांनी आणि पालकांनी केली आहे.
पुणे महापालिकेतर्फे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक भव्य व्यंगचित्र कलादालनाच्या रुपाने सणस मैदानासमोर उभे केले जाणार आहे. तशी घोषणा शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांनी गेल्या महिन्यात केली होती. बाजीराव रस्त्यावरील सणस मैदानासमोर असलेल्या बालभवनाशेजारची जागा (फायनल प्लॉट क्रमांक ४० बी २, महापालिका कोठीलगत, प्रभाग क्रमांक ५७) या स्मारकासाठी घेतली जाणार आहे, असेही हरणावळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. या स्मारकासाठी वीस हजार चौरसफूट जागा लागणार असून दोन मजली वास्तू उभी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
स्मारकासाठी गरवारे बालभवनाची जागा घेतली जाणार आहे का, असे विचारल्यानंतर हरणावळ यांनी बालभवनालगतची जागा स्मारकासाठी निश्चित करण्यात आल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात, आता बालभवनची काही जागा स्मारकासाठी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे बालभवनशी संबंधित सर्व कार्यकर्ते, कार्यकर्त्यां, आजी-माजी पालक, विद्यार्थी, शिक्षिका अशा सर्वामध्ये अस्वस्थता पसरली असून कोणत्याही परिस्थितीत मुलांचे हे हक्काचे ठिकाण हिरावून घेऊ नका, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. तसे निवेदन आयुक्तांनाही देण्यात आले आहे.
बालभवन हा उपक्रम गेली २७ वर्षे सुरू असून रोज पाचशे मुले या ठिकाणी खेळण्यासाठी येतात आणि वर्षभर या ठिकाणी सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. पुणे महापालिका आणि गरवारे ट्रस्ट यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. महापालिकेने १९७९ मध्ये ही जागा आंतरराष्ट्रीय बालक वर्षांच्या निमित्ताने पुण्यातील मुलांच्या खेळण्यासाठी राखून ठेवली. तसा ऐतिहासिक ठराव महापालिकेने केला आणि तो महाराष्ट्रातील सर्व संस्थांना आदर्श वाटला. पुढे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बालभवने सुरू झाली. ही संस्था नसून मुलांची चळवळ आहे. बालभवन हे पीपीपी मॉडेलचे उत्तम उदाहरण आहे. ठाकरे यांच्या स्मारकाला आमचा विरोध नाही. मात्र, खेळणे या मुलांच्या हक्कासाठी मैदान शिल्लक ठेवणे हे प्रत्येक मोठय़ा माणसाचे कर्तव्य आहे. त्यासाठी बालभवनची जागा घेऊ नये, असे पालकांचे आणि मुलांचे म्हणणे आहे.
 शिवसेनाप्रमुखांचे स्मारक कलादालनाच्या रुपाने उभे करण्याचा निर्णय महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत यापूर्वीच एकमताने घेण्यात आला होता. त्यानुसार या वास्तूत दोन भव्य कलादालने साकारणार आहेत. त्यातील एका कलादालनात ठाकरे यांची निवडक व्यंगचित्रे कायमस्वरुपी प्रदर्शित केली जातील, तर दुसऱ्या दालनात नवोदित व्यंगचित्रकारांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन वेळोवेळी लावले जाईल. या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये खर्च येणार असून त्यातील सत्तर लाख रुपये चालू अंदाजपत्रकातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
‘स्मारक मागील बाजूस’
दरम्यान, ठाकरे यांचे स्मारक व कलादालन बालभवन इमारतीच्या मागील बाजूला होणार आहे. तसेच, जी जागा कमर्शियल म्हणून आरक्षित आहे त्याच जागेत हे स्मारक होणार आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून तसेच हरणावळ यांच्याकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा