ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या प्रदीर्घ संगीतसेवेचा सन्मान करण्यासाठी नाटय़संपदा प्रतिष्ठानतर्फे दोन मार्चपासून दोन दिवसांच्या ‘गानसरस्वती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि किशोरीताईंचे शिष्य रघुनंदन पणशीकर आणि शिष्यांतर्फे जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका म्हणून किशोरीताईंच्या सन्मानार्थ गुरुपूजन करण्यात येणार आहे.
गणेश कला क्रीडा मंच येथे दोन मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सिवामणी यांच्या बहारदार ‘ट्रायो’ कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. यामध्ये रवी चारी आणि अतुल राणिंगा यांचा सहभाग आहे. भारती आमोणकर यांचे ओडिसी नृत्य सादर होणार असून त्यानंतर जयपूर घराण्याच्या डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनाची मैफल होणार आहे. तीन मार्च रोजी रवी चारी आणि मििलद रायकर यांच्या सतार आणि व्हायोलिन जुगलबंदीने सकाळी नऊ वाजता दुसऱ्या सत्राची सुरुवात होणार आहे. किशोरी आमोणकर यांच्या गायनाने या सत्राची सांगता होणार आहे.
प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने सायंकाळच्या सत्राची सुरुवात होणार आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या हस्ते पायामध्ये सुवर्ण कडे घालून किशोरीताईंचे गुरुपूजन केले जाईल. ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक आणि संगीत समीक्षक मुकुंद संगोराम या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. बुजुर्ग गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने ‘गानसरस्वती’ महोत्सवाची सांगता होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा