औद्योगिक सुटी आणि शासकीय सुटीची पूर्वसंध्या असा दुहेरी योग साधत पुणेकर गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडले आणि यंदाच्या गणेशोत्सवातील उत्साही गर्दीचा उच्चांक गुरुवारी कार्यकर्त्यांनी अनुभवला.
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर यंदा अनेक मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करीत दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. मात्र, मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, हुतात्मा बाबूगेनू मंडळ या मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. गुरुवारची औद्योगिक सुटी असल्याने िपपरी-चिंचवडसह उपनगरांतून सायंकाळपासूनच नागरिकांनी पुण्याची वाट धरली. त्याचप्रमाणे शुक्रवारी शासकीय सुटी असल्याचा लाभ घेत अनेकांनी रात्र जागून काढली. मंडळांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले असल्याने गुरुवारी गणेशभक्तांची गर्दी होणार हा अंदाज सायंकाळपासूनच खरा ठरू लागला.
शहराच्या पेठांमध्येच गणेश मंडळांची संख्या अधिक असल्याने सायंकाळपासूनच मध्य पुण्यातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा ते जेधे चौक, बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते शनिवारवाडा आणि लक्ष्मी रस्त्यावरील टिळक चौक ते बेलबाग चौक हे प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्यांना लांबचा पल्ला गाठावा लागला. दुचाकीवरून आलेल्या नागरिकांनी पोलिसांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच वाहने लावण्याची दक्षता घ्यावी यासाठी पोलिसांना मदत करणारे युवा कार्यकर्ते आग्रही होते. काही ठिकाणी नागरिकांची या कार्यकर्त्यांशी किरकोळ शाब्दिक चकमक उडाली.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळाने सादर केलेला ‘आता हवी शिक्षणक्रांती’ हा जिवंत देखावा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. हत्ती गणपती मंडळाच्या देखाव्यातून दुष्काळाकडे वेधलेले लक्ष, सानेगुरुजी मंडळाने साकारलेला ५१ फूट उंचीचा ‘जय मल्हार गणेश’, नातूवाडा मित्र मंडळाचा वैज्ञानिक देखावा, संगीताच्या तालावर नर्तन करणारी नातूबाग मंडळाची विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक सहकुटुंब आले होते. थकलेल्या पावलांनी पोटपूजा करण्यासाठी हॉटेलचा रस्ता धरला. ताजेतवाने होऊन पुन्हा एकदा गणपती पाहण्यासाठी सज्ज झालेल्या नागरिकांनी रात्री बारानंतर ध्वनिवर्धकाचा आवाज थांबल्यानंतरही देखावे पाहण्याचा आनंद लुटला. रस्त्याच्या कडेला फेरीवाल्यांच्या स्टॉल्सवर खरेदी होत होती. काही युवक-युवतींनी हौस म्हणून टॅटू काढून घेतला. तर, मधूर सुरावटींनी लक्ष वेधल्या गेलेल्या बालकांचा बासरी घेण्याचा हट्ट पालकांनी पुरविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा