नावीन्यपूर्ण तालांसह झालेले बहारदार ढोल-ताशावादन.. या तालावर भगवा ध्वज नाचविणारे युवक-युवती.. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला पावसाळी वातावरणाने दिलेला कौल.. रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या नागरिकांनीही नकळतपणे तालावर थिरकण्याचा लुटलेला आनंद.. आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथामध्ये विराजमान झालेली गणरायाची मूर्ती.. मंगलमूर्ती मोरयाचा गजर.. अशा उत्साही वातावरणात गणरंगी रंगण्याच्या आनंद पर्वणीची सोमवारी प्राणप्रतिष्ठापनेने नांदी झाली. मानाच्या गणपतींची मुहूर्तावर विधिवत पूजेने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
प्रत्येकाच्या जीवनातील विघ्नांचे हरण करून सुखाची पखरण करणाऱ्या पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेशोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली. घरोघरी षोडशोपचार पूजनाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेसाठी पहाटेपासूनच मुहूर्त होते. त्यामुळे अनेकांनी रविवारी सायंकाळनंतर गणरायाची मूर्ती घरी आणून ठेवली होती, तर काहींनी सोमवारी सकाळी गणेश मूर्ती घरी आणून तिची प्राणप्रतिष्ठापना केली.
घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर कार्यकर्ते मंडळांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत आणि ढोल-ताशा पथकात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ढोल-ताशांचा गजर सुरूच होता.
दरम्यान, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणरायाची प्रतिष्ठापना संभाजी भिडे गुरुजी आणि पुनीत बालन यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता झाली. त्यापूर्वी उत्सव मंडपापासून मिरवणूक काढण्यात आली.
पुणे फेस्टिव्हल
पुणे फेस्टिव्हलच्या गणरायाची प्रतिष्ठापना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एम. उमराणी यांच्या हस्ते झाली. अभिनेत्री गिरीजा प्रभू, मानसी मुसळे, आयली घिया, अमृता चव्हाण या वेळी उपस्थित होत्या.
बाजार फुलले
गणपतीच्या पूजेसाठी दूर्वा, कमळ, केवडा, गुलाब, शमी, अत्तर, अगरबत्ती, कापूर, पाच फळांचा वाटा, माव्याचे मोदक या साहित्य खरेदीसाठी मंडई आणि तुळशीबाग परिसरासह अनेकविध भाग गर्दीने फुलून गेले होते.
श्री कसबा गणपती
पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना क्रिया योगाचे अभ्यासक आणि आध्यात्मिक गुरू श्री. एम. यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी झाली. प्रतिष्ठापनेपूर्वी उत्सव मंडपातून ८.३० वाजता मिरवणूक निघाली. हमालवाडा येथून मूर्तिकार नीलेश पार्सेकर यांच्याकडून मूर्ती घेतल्यानंतर मिरवणूक पुन्हा उत्सव मंडपात आली.
हुतात्मा बाबू गेनू मंडळ
सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना शिवाजी मुजुमले, विश्वास शितोळे आणि सौरभ कुलकर्णी यांच्या हस्ते झाली. त्यापूर्वी मयूर रथातून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली.
श्री तुळशीबाग मंडळ
श्री तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची प्रतिष्ठापना बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता झाली. त्यापूर्वी गणपती चौकातून सुरू झालेल्या मिरवणुकीमध्ये विविध पथके सहभागी झाली होती.
अखिल मंडई मंडळ
विशाल ताजणेकर यांनी साकारलेल्या भव्य र्तीथकर जैन मंदिरामध्ये अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची मूर्ती विराजमान झाली. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी उत्सव मंडपापासून मिरवणूक काढण्यात आली.
श्री गुरुजी तालीम मंडळ
सुभाष सरपाले यांनी साकारलेल्या फुलांच्या रथातून श्री गुरुजी तालीम मंडळ या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक निघाली. उद्योजक विशाल चोरडिया आणि श्वेता चोरडिया यांच्या हस्ते दुपारी १ वाजता प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सुनील शेंडकर यांनी साकारलेल्या ‘बाहुबली महल’मध्ये गणराय विराजमान होणार आहेत.
दगडूशेठ हलवाई गणपती
ओडिशा येथील श्री गणेश सूर्यमंदिरामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना शिर्डी कोकमठाण येथील विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते झाली. श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी या वेळी उपस्थित होते. त्यापूर्वी मंदिरापासून सुरू झालेल्या मिरवणुकीमध्ये विविध पथके सहभागी झाली होती.
श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ
ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी १० वाजता उत्सव मंडपातून निघाली. एस. बालन समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन आणि धारिवाल समूहाच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते दुपारी १ वाजता प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
केसरीवाडा गणेशोत्सव</strong>
केसरीवाडा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला रमणबाग प्रशाला चौकातून सकाळी १० वाजता सुरुवात झाली. केसरी मराठा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, रोहित टिळक आणि प्रणती टिळक यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली.