पुणे : कला आणि ज्ञानाच्या क्षेत्रातील सरावाचे अनन्यसाधारण महत्त्व ध्यानात घेऊन गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने गुढीपाडवा ते हनुमान जन्मोत्सव अशा १४ दिवसांतील संवादिनी सराव वादनाची १००८ तासांची संकल्पपूर्ती करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ज्येष्ठ संवादिनीवादक पंडित प्रमोद मराठे यांच्या संकल्पनेतून आयोजित उपक्रमात गुरूंसह शिष्यांनी दररोज १८ तास याप्रमाणे संवादिनी सराव वादन केले. या उपक्रमात सात ते ७० वर्षे या वयोगटातील ६० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. प्रत्येक तासात चार ते पाच विद्यार्थी सामूहिक संवादिनी सराव वादन करत होते. विद्यार्थ्यांनी विविध राग, पलटे यांचा सराव केला. वादनात एकसुरीपणा येऊ नये, यासाठी दर अर्ध्या तासाने पलटा बदलला जात होता.

विद्यार्थ्यांमध्ये सराव करण्याची इच्छा आणि गोडी निर्माण व्हावी याकरिता हा संकल्प केला असल्याचे प्रमोद मराठे यांनी सांगितले. ‘१९८३ पासून सामूहिक संवादिनी सराव वादनाचा उपक्रम सुरू असून, सुरुवातीस फक्त रामनवमीच्या दिवशी सराव वादन केले जात असे. विद्यार्थिसंख्या वाढत गेल्यानंतर हे सराव वादन २४ तास केले जात असे. सहा वर्षांपूर्वीपासून गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत पहाटे सहा ते रात्री नऊ असे सलग १५ तास सराव वादन करून १०८ तासांचा टप्पा गाठला गेला. मात्र, १००८ तास सामूहिक सराव वादन करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमात कर्नाटकमधील यल्लापूरजवळील लहानशा गावातून आलेल्या सविता हेगडे या गुरुकुलातील विद्यार्थिनीने, तसेच मयुरेश गाडगीळ या गुरुकुलातीलच दृष्टिहीन विद्यार्थ्याने १०८ तास सरावाची संकल्पपूर्ती केली. पुण्याबाहेरीलही काही विद्यार्थी या कालावधीत महाविद्यालयात येऊन सरावात सहभागी झाले. प्रमोद मराठे, प्राचार्य, गांधर्व महाविद्यालय