जवळपास २५ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये व्याख्यानमाला सुरू करणे तसे धाडसाचे होते. मात्र, प्रा. रामकृष्ण मोरे यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाने तेव्हा ही चळवळ सुरू केली, ती आता रौप्यमहोत्सवी वर्षांत पोहोचली आहे. राज्यभरातील अनेक मान्यवर वक्तयांनी लावलेली हजेरी, अनेक कडूगोड अनुभव आणि प्रतिकूल परिस्थितीतही मंडळाने ही चळवळ कायम ठेवली आहे.
गांधी पेठ तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे व व्याख्यानमाला समन्वय समितीचे समन्वयक सुहास पोफळे यांनी या प्रवासाची माहिती दिली. मे १९९१ मध्ये मंडळाच्या जिजाऊ व्याख्यानमालेला सुरुवात झाली. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानमाला सत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यासाठी आम्ही चिंचवडचे कार्यकर्ते नियमितपणे जात होतो. याच दरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे यांच्याशी या संदर्भातील विषय चर्चेत आला. व्याख्यानाची आमची आवड पाहून तुम्हीही चिंचवडला व्याख्यानमाला सुरू करा, असे त्यांनी सुचवले. एवढय़ावर ते थांबले नाहीत. प्रा. सदानंद मोरे, दया पवार, रामदास फुटाणे आदी वक्ते त्यांनी पहिल्या वर्षांसाठी ठरवून दिले, त्यामुळे पहिल्या वर्षी चांगली सुरुवात झाली खरी. नंतर मात्र अनुभव नसल्याने दडपण होते. व्याख्यानांसाठी चांगले वक्ते मिळतील का, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल का आणि हे सगळे आपल्याला झेपेल का, अशी भीती होती. मात्र, मोरे ठामपणे पाठिशी राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊ मातेचे नाव व्याख्यानमालेला दिले. जिजाऊंच्याच नावाचे पुरस्कार देऊन आदर्श मातांचा गौरव करणारी परंपराही सुरू केली. आतापर्यंत या व्याख्यानमाला चळवळीत प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, शिवाजी सावंत, निनाद बेडेकर, दाजी पणशीकर, अविनाश धर्माधिकारी, विजय कुवळेकर, उल्का महाजन, अरविंद इनामदार, प्रकाश जावडेकर, रामकृष्ण मोरे, माधव भांडारी, डॉ. रत्नाकर महाजन, विसुभाऊ बापट, समीरण वाळवेकर, डॉ. रमा मराठे, वर्षां देशपांडे, वर्षां गायकवाड आदी वक्तयांनी हजेरी लावली. श्रीकांत चौगुले, नाना शिवले, प्रा. महादेव रोकडे या स्थानिक वक्तयांनाही संधी देण्यात आली. प्रा. मनोज खळदकर हे नियमितपणे येणारे श्रोते होते. ते नंतर वक्ते झाल्याचा वेगळा अनुभवही आहे. दोन-दोन महिने जय्यत तयारी करूनही अनेकदा व्याख्यानांना अपेक्षित गर्दी झाली नाही. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, क्रिकेटचे सामने त्याचे कारण होते. वेळेवर कार्यक्रम सुरू न झाल्याने वक्तयाने कानउघडणी केल्याचे उदाहरणही आहे. तसेच, ठरलेल्या दिवशी वक्ता न आल्याने झालेली फजितीही अनुभवली. बिकट प्रसंगी मानापमानाचा विचार न करता धावून आलेले वक्तेही स्मरणात असल्याचे संयोजक सांगतात. दिवसरात्र झटणारे कार्यकर्ते व सगळी कामे बाजूला ठेवून कार्यक्रमांना हमखास हजेरी लावणारे दर्दी प्रेक्षक हे जिजाऊ व्याख्यानमालेचे वैशिष्टय़े आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा