लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : गांधी स्मारक निधीतर्फे गांधी भवन येथे आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनात ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया ‘मी आणि गांधीजी’ या विषयावर बोलत होते. लेखक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी या वेळी उपस्थित होते.
अरुण फिरोदिया म्हणाले, ‘ ब्रिटिश त्यांच्या देशातून कापड आणायचे आणि ते इथे विकायचे. ब्रिटिशांनी भारतीय उद्योग बुडवणारी अनेक धोरणे आणली. त्यांनी या देशातील कापड व्यवसायाला बुडवण्यासाठी कापसाच्या व्यापारावर प्रचंड कर लावला. मात्र, गांधींनी इंग्रजांना शह देण्यासाठी स्वदेशीचे सूत्र अवलंबले. त्यांनी खादीला चालना दिली. चरखा चालविण्याची मोहीम सुरू केली. शेतकऱ्यांना जोडधंदा मिळावा हा उद्देशही त्यामागे होता. भारतात एखादे उत्पादन चालले, तर ते जगभरात का चालणार नाही?, हे गांधींचे तत्त्व डोळ्यासमोर ठेऊन आपले तंत्रज्ञान प्रगत केले पाहिजे, या उद्देशाने मी अमेरिकेत होतो तेव्हा माझ्या वडिलांनी तू भारतात ये, आपल्याला मोपेड स्कूटर तयार करायची आहे, असे पत्राद्वारे कळविले. सायकल आणि मोटार यांमधील वाहन करायचे आहे, असे सांगून त्यांनी मला १५ लाख रुपये दिले. त्यावर अभ्यास करून भारतीयांची नेमकी गरज काय आहे? हे लक्षात घेऊन आम्ही लुना तयार केली. भारतीय रस्त्यांवर चालणारी ही गाडी जगात कुठेही चालेल. त्यामुळे ५० हजार लुना अमेरिकेला निर्यात केल्या. गांधीजींनी सांगितलेले स्वावलंबनाचे तत्त्वच मला या कमी मदतीला आले.
स्वावलंबन, आपल्या गरजा कमी ठेवाव्यात, अशी गांधीजींची तत्त्वे जगभरातील अनेक देश आणि नागरिक अंमलात आणत आहेत. गांधींचे विचार त्रिकालबाधित सत्य आहेत. त्यामुळे ७०-८० वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलेली तत्वे, विचार आणि सूत्र आजही लोकांना पटत आहेत. त्याची अंमलबजावणीही होत आहे. हाच गांधी विचारांचा विजय आहे. गांधीजींची अहिंसा हे ब्रिटिशांविरोधात लढण्याचे साधन होते, ती फॅशन नव्हती.’
गांधी विचारांशी विसंगत असलेले सरकार
गांधी विचार साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार म्हणाले यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, ‘आता सत्ताधारी विविध योजनांच्या नावाखाली लाभार्थी तयार करत आहेत. काहीही काम न करता पैसे खात्यात देणे हे काम नाही केले तर वेतन घेण्याचा अधिकार नाही, असे सांगणाऱ्या गांधीजींच्या विचारांशी ही सरकार विसंगत आहे. काम न करता तुमच्या खात्यात पैसे टाकतो, तुम्ही केवळ मत द्या, या दिशेने देश जात आहे.
प्रश्न विचारणारे, सत्याच्या बाजूने उभे राहणारे सर्वसमावेशक लोक सर्वपक्षीयांना नको आहेत. याला पर्याय द्यायचा असल्यास गांधींनी सांगितल्याप्रमाणे ‘करके देखो’ आचरणात आणले पाहिजे. गांधींच्या वाटेवरून चालतो, हे सांगणे देखील धारिष्ट्याचे आहे. ज्या राजकारणाचे अधिष्ठान गांधींनी घालून दिले, ते आता ‘कटेंगे तो बटेंगे’ इथवर आले आहे. एक टक्के लोकांच्या हातात ४० टक्के संपत्ती एकवटली आहेत. अशा प्रकारची विषमता देशात आहे. गांधी, नेहरूंनी ज्या राष्ट्राची उभारणी केली, त्याच्या विरोधात देशाचा प्रवास सुरू आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर गांधी आठवायचे आहेत. वर्तमानपत्र हा सेवेसाठी, सत्य सांगण्यासाठी आहेत, असे गांधी मानत. तो पोट भरण्याचा धंदा नाही, असे ते सांगत. आता जाहिरातींना ग्राहक मिळवून देणे वर्तमानपत्राचे सूत्र झाले आहे. मात्र, हे बदलायचे असेल, तर भांडवलदारांना दूर करावे लागेल. मग वर्तमानपत्र २०-२५ रुपयांना मिळेल, ते आपण खरेदी करू का? हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. वर्तमानपत्रांवर आताच दबाव आहे, असे नाही. सर्व काळात वर्तमानपत्रांवर दबाव होता. त्यामुळे मिळालेल्या चौकटी गांधी विचार मांडण्यासाठी वापरणार की नाही? हा प्रश्न आहे.’