पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गणेश अथर्वशीर्षाचा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘व्यक्तिमत्त्व विकासाचा आलेख – मन:शांतीचा राजमार्ग श्री गणेश अथर्वशीर्ष’ असे नाव असलेल्या या अभ्यासक्रमासाठी एक श्रेयांक मिळणार असून, कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संस्कृत-प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी संस्कृत विभाग यांच्यातर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात दगडूशेठ गणपती मंदिरात नुकताच झाली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, संस्कृत आणि प्राकृत विभागप्रमुख डॉ. देवनाथ त्रिपाठी, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, डॉ. अ. ल. देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा: पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षांना डिसेंबरपासून सुरुवात
डॉ. काळे म्हणाले,की मंत्राचे महत्त्व, शारीरिक आणि मानसिक फायदे लोकांपर्यंत पोहोचल्यास सर्व जण त्याचा मनस्वी आनंद घेतील. हा अभ्यासक्रम एकाच विद्यापीठापुरता मर्यादित न ठेवता सर्वच विद्यापीठात असायला हवा. शिक्षणात अध्यात्म, ज्ञान आणि विज्ञानाची योग्य सांगड घालणे महत्त्वाचे आहे.