पहाटे ४.५० ते दुपारी १.५३ पर्यंत पूजनाचा मुहूर्त
सर्व विघ्ने दूर करून चैतन्याची लयलूट करणाऱ्या वैभवशाली गणेशोत्सवाची सोमवारी (२ सप्टेंबर) विधिवत पूजनाने प्राणप्रतिष्ठापना करून अकरा दिवसांच्या आनंदसोहळ्याचा श्रीगणेशा होणार आहे. ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने गणरायाची प्रतिष्ठापना करता येणार आहे. मानाच्या मंडळांसह सर्व गणेश मंडळे वाजतगाजत मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज झाली आहेत.
‘पुढच्या वर्षी लवकर या..’ या आपण केलेल्या प्रार्थनेनुसार गणराय सोमवारपासून अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी येणार आहेत. सर्व दु:खांवर मात करण्याची शक्ती देणारा आणि सर्वत्र उत्साहाने भारलेल्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी घरातील आबालवृद्धांपासून ते गणेश मंडळांचे कार्यकर्ते गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सजावटीचे साहित्य खरेदी करून प्रत्यक्ष आरास करण्यासाठी आणि पूजा साहित्याची खरेदी करण्यासाठी सर्वाना रविवारची सुट्टी उपयोगी पडली. गणरायाच्या आवडीच्या दूर्वा, फुले, गुलाब, केवडापान, शमी यांसह महिलांनी हरतालिका व्रताच्या पूजनासाठी साहित्य खरेदी केले. खरेदीसाठी हुतात्मा बाबूगेनू चौक, मंडई आणि शनिपारपरिसरात झालेल्या गर्दीने पायी चालणे अवघड झाले होते. तर, दुचाकीस्वारांना वाट काढणे मुश्कील झाले होते.
पारंपरिक पेहराव परिधान केलेल्या घरातील तीन पिढय़ांसह अनेकांनी आगाऊ नोंदणी केलेली गणेश मूर्ती रविवारी सायंकाळी घरी आणली. गणेश मूर्ती घरी आणताना बाळगोपाळांचा आनंद द्विगुणित झाला होता. गणेश मूर्तीसमवेत जानवी जोड, रुमाल, हळद-कुंकू, गुलाल, बुक्का, उदबत्ती, कापूर अशा पूजा साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून खरेदी करण्यात आली. गणेश मंडळ कार्यकर्त्यांची प्राणप्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीची तयारी सुरू होती. गुरुजींना निरोप देण्यापासून ते बँडपथक, ढोल-ताशा पथकांची रचना तसेच रथाची सजावट या कामांची पूर्तता करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.
सोमवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला देशभरात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. सोमवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील गणरायाचे पूजन करून विधिवत प्राणप्रतिष्ठापना करावी, असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मध्यान्हीनंतर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. गणेशोत्सव हा घरातील प्रत्येकाचा सण आहे. घराण्याच्या रीतरिवाजानुसार आपल्या घरी उत्सव असेल, तितके दिवस दररोज सकाळी पूजा आणि रात्री आरती व मंत्रपुष्प केल्याने घरात प्रसन्न वाटते. घरातील प्रतिष्ठापनेची मूर्ती सुमारे एक वीत म्हणजेच सात ते आठ इंच उंचीची असावी. ही मूर्ती मातीची अथवा शाडूची असावी, असे दाते यांनी सांगितले.