सरकारने नव्याने सुरु केलेली करप्रणाली म्हणजेच जीएसटीचा गणेशोत्सवाला फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर सुरुवातीला व्यापारी वर्ग संभ्रमात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता या करप्रणालीने मूर्तीकारांसमोर संकट निर्माण केल्याचे दिसते. मेहनत घेऊन तयार केलेल्या मूर्तीला बाजारात योग्य भाव मिळेल का? असा प्रश्न मूर्तीकारांना पडला आहे. नव्या करप्रणालीची झळ मूर्तीकारांसोबतच गणेश मंडळांना देखील सहन करावी, लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थातच यंदाच्या गणेशोत्सवावर जीएसटीमुळे विघ्न येण्याचे संकेत निर्माण झाले आहेत.
जीएसटीमुळे पिंपरी-चिंचवडमधील कारागिरांची आणि कारखान्याची परिस्थिती बिकट आहे. गेली १० ते १२ वर्षें शहरात सुखाने व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आणि मालकांना मूर्तीला योग्य भाव मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा थोडा संकटमय असल्याचे भावना मूर्तीकार तसेच व्यावसायिकातून उमटताना दिसते. जीएसटीमुळे रंगाचा आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा भाव वाढला आहे. परिणामी गणेश मुर्तीकारांना योग्यभाव मिळणे कठीण झाल्याचे दिसते. एकीकडे काही मूर्तीकार आणि व्यावसायिक जीएसटीमुळे योग्य भाव मिळणार नाही, यामुळे चिंतेत असताना दुसरीकडे या संकटावर मात करत काही कारागीर मोठ्या आशेने लालबाग, बाहुबली, दगडूशेठ यांच्या रुपातील मूर्ती साकारण्यात मग्न झाले आहेत. या मुर्तीला आकार देण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असून त्यांना योग्य तो भाव मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पिंपरी-चिंचवडमधील किवळे येथे महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून गणेश मंडळे मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्याने येतात. जीएसटीनंतर या बाजारपेठेत स्थिती पहिल्यासारखी असणार की, मूर्तीकारांचा संभ्रम आणखी वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
विशेष म्हणजे येथील कारागीर गणेश भक्तांनी दरवर्षी विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती पुन्हा कारखान्यात आणून त्यांना रंगरंगोटी करून योग्य दरात विक्रीस ठेवतात. यामुळे जलप्रदूषणालाही आळा बसतो. जीएसटीच विघ्न पार करुन गणपती उत्सव पहिल्यासारखाच साजरा होईल, ही आस सर्व गणेशभक्तांना नक्कीच असेल.