ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांवर भर, गुलालाऐवजी भंडारा आणि भंडाऱ्याऐवजी फुलांची उधळण करण्याकडे मंडळांचा कल, लक्षवेधी रथ आणि विविध कलापथकांचा समावेश असणाऱ्या मिरवणुका काढत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. मंडळांचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झालेल्या वादांचे किरकोळ प्रकार वगळता शहरभरात विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील विसर्जन मिरवणुकांचा आनंद घेता यावा, यासाठी शहरातील अनेक भागांत सातव्या तसेच अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पिंपरीच्या कराची चौकातून जाणारी तसेच चिंचवडच्या चापेकर चौकातून जाणारी विसर्जन मिरवणूक महत्त्वाची मानली जाते. त्यासाठी पिंपरीत सुभाषनगर येथील घाटावर तर चिंचवड- थेरगाव मार्गावरील घाटावर विसर्जनाची व्यवस्था करण्यात येते. पिंपरीत दिवसभरात ५७ तर चिंचवडला ५६ मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. दोन्हीकडे सकाळी घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. दुपारी मंडळांचे गणपती येऊ लागले.

चिंचवडला दुपारी दोन वाजता भोईर आळीतील मोरया मंडळाचा गणपती विसर्जनासाठी आला. त्यापाठोपाठ, जय गणेश, ओंकार, मोरया तरूण, सूर्योदय, अिजक्य अशी मंडळांची रांग लागली. रात्री बारानंतरही विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. चापेकर चौकात पोलीस व पालिकेचा एकच स्वागत कक्ष होता. महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी मंडळांचे स्वागत केले. मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांची तुम्डुंब गर्दी होती. मंडळांचे भव्य रथ, कलापथके आणि मिरवणुका लक्षवेधी होत्या.

पिंपरीत फुलांची उधळण

पिंपरीत दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक रात्रीपर्यंत चालली. बहुतांश मंडळांनी भंडाऱ्याऐवजी फुलांची उधळण केली. भंडाऱ्याचा वापरही कमी प्रमाणात झाला. येथील विसर्जन घाटावर ५७ मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. पिंपरीत कराची चौकात पालिकेचा स्वागत कक्ष होता. महापौर राहुल जाधव यांनी मंडळांचे स्वागत केले. घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर दुपारी सर्वप्रथम जीकेएन सटर्ड कंपनीच्या ‘श्री’चे विसर्जन झाले. रात्री नऊपर्यंत ३४ मंडळांनी गणरायाला निरोप दिला. पारंपरिक वाद्यांचा वापर अधिक प्रमाणात झाला. श्री लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेच्या मंडळाने नेहमीची परंपरा याही वर्षी कायम राखली. शिवराजे प्रतिष्ठानने फुलांची उधळण केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेधक वेषभूषा सादर केली होती. मोरे भंडार मंडळाने रथाला आकर्षक फुलांची सजावट केली होती. शिवशक्ती तरुण मित्र मंडळाच्या मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मिरवणुकीत शेवटच्या पाच मंडळांनी डीजेचा वापर केल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाचे ७५ जणांचे पथक सज्ज होते. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भोसरीत भव्य मिरवणुका 

भोसरीत अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जनाची परंपरा आहे. त्यानुसार, शनिवारी भोसरीकरांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. सकाळी घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. दुपारपासून सोसायटय़ांचे तर सायंकाळी मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले होते. लांडगे आळीतील बापूजीबुवा मंदिरापासून मंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला. विसर्जन मार्गावर दुतर्फा मोठय़ा संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. विविध पथकांचा समावेश असलेल्या आकर्षक व भव्य मिरवणुका, देखणे रथ आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांची लक्षवेधी वेषभूषा हे भोसरीच्या मिरवणुकांचे वैशिष्टय़ होते. पालिकेने भोसरीच्या गावमैदानात विसर्जन हौद उभारला होता. त्या ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. तसेच, पीएमपी चौकात स्वागत मंडप उभारण्यात आला होता. पालिकेच्या वतीने तेथे मंडळांच्या प्रमुखांचे स्वागत करण्यात येत होते. विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh immersion in maharashtra 2018
Show comments