अनेकांचे मोबाइल संच आणि पाकिटे लांबविली

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी राज्य तसेच परराज्यातून मोठय़ा संख्येने नागरिक येतात. या उत्सवी गर्दीत चोरटय़ांचा सुळसुळाट होतो. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणूक सोहळय़ात मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या. विसर्जन मार्गावर मोबाइल चोरटय़ांनी अक्षरश: उच्छाद घातला. शेकडो मोबाइल गर्दीत गहाळ झाले तसेच चोरीलादेखील गेले.

लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर, केळकर या चार प्रमुख विसर्जन मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मोबाइल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची पथकेदेखील नेमण्यात आली होती. त्यापैकी सर्वाधिक मोबाइल चोऱ्या लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौक ते टिळक चौक (अलका टॉकीज) दरम्यान घडल्या. त्या खालोखाल टिळक रस्त्यावर मोबाइल चोऱ्या झाल्या. त्या तुलनेत केळकर आणि कुमठेकर रस्त्यांवर मोबाइल चोऱ्यांचे प्रमाण कमी होते. मानाचे गणपती मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळी रोषणाईचे गणपती लक्ष्मी रस्त्यावर दाखल होतात. बहुतांश मोबाइल चोरीच्या घटना या सायंकाळनंतर झालेल्या आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई मंडळ, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, जिलब्या मारुती मंडळ या मंडळांची मिरवणूक पाहण्यासाठी रात्री अकरानंतर बेलबाग चौक भागात गर्दी झाली होती. त्या वेळी अनेकांचे मोबाइल आणि पाकिटे लांबविण्यात आली. मोबाइल, पाकिटे लांबविणे, दागिन्यांची चोरी करण्यासाठी उत्सवाच्या काळात खास परगावातील चोरटे पुणे शहरात दाखल होतात. बेलबाग चौक, मंडई भागात उत्सवाच्या कालावधीत महिलांचे दागिने आणि मोबाइल लांबविण्याच्या घटना घडल्या. पोलिसांकडून चोरटय़ांना पकडण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरी करणाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

मालेगावातील टोळीला पकडले; ७५ मोबाईल संच जप्त

विसर्जन मिरवणुकीत नागरिकांचे मोबाईल संच लांबविणाऱ्या मालेगावातील चोरटय़ांच्या टोळीला पोलिसांना रविवारी मध्यरात्री पकडले.  विसर्जन मिरवणुकीत चोरी करण्यासाठी चोरटे खासगी वाहनातून पुण्यात आले होते. मालेगावातील चोरटय़ांच्या टोळीकडून ७५ मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले मोबाईल संच येत्या दोन दिवसात तक्रारदारांना परत करण्यात येणार आहेत, असे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी सांगितले.

विसर्जन घाटावर बालिकेच्या हातातील बांगडी चोरली

शिवाजीनगर येथील काँग्रेस भवननजीक असलेल्या विसर्जन घाटावर आईबरोबर आलेल्या बालिकेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबविण्यात आली. याबाबत पूनम काळे (वय ३२,रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेला याप्रकरणी अटक केली आहे.