अनपेक्षितपणे मध्यरात्रीपूर्वीच मिरवणुकीत दाखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशभक्त ज्यांची आतुरतेने वाट पाहात असतात त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा श्री ‘विश्वविनायक’ रथ आणि अखिल मंडई मंडळाच्या ‘शिवशौर्य’ रथाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अन्य मंडळांना विनंती करून पोलिसांनी मार्ग उपलब्ध करून दिल्यामुळे अनपेक्षितपणे विद्युत रोषणाईतील ही मानाची मंडळे मध्यरात्रीपूर्वीच लक्ष्मी रस्त्यावर दाखल झाली. पहाटे पाचच्या सुमारास दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यामुळे त्यानंतर आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला.

मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर काही मंडळे बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ झाली. अंधार पडल्यानंतर जिलब्या मारुती मंडळाचा गणपती सायंकाळी सातच्या सुमारास बेलबाग चौकात दाखल झाला. त्याचवेळी दगडूशेठ गणपती आणि मंडई मंडळाचा गणपती मिरवणुकीत दाखल होणार ही खूणगाठ बांधत अनेक गणेशभक्तांनी लक्ष्मी रस्ता गाठला. हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणपती आठच्या सुमारास बेलबाग चौकात आला. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारलेल्या लोटस रथामध्ये गणपती विराजमान झाला होता. त्यापाठोपाठ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचा गणपती पारंपरिक रथामध्ये विराजमान झाला होता. सव्वाआठच्या सुमारास गणपती रथ मार्गस्थ झाला.

महादेवाच्या शौर्याची प्रतीके असलेल्या शिवशौर्य रथात अखिल मंडई मंडळाची मिरवणूक निघाली. हलत्या झोपाळ्यावर विराजमान शारदा-गजानानाची प्रसन्न मूर्ती पाहताना गणेशभक्तांनी मोबाइलमध्ये आकर्षक रथ आणि शारदा-गजानानाची छायाचित्रे टिपली.  मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त रांगोळी आणि फुलांच्या पायघडय़ा घालून गणरायाला निरोप देण्यात आला. शिवगर्जना, नूमवि, गजर ही ढोल-ताशा पथके आणि न्यू गंधर्व बँडपथक, जयंत नगरकर यांचे नगारावादन आणि  खळदकर बंधूंचे सनईवादन ही पथके मिरवणुकीच्या अग्रभागी होती. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहाटे साडेचार वाजता पांचाळेश्वर घाट येथे हौदात विसर्जन करण्यात आले.

मोतिया रंगांच्या २७ हजार दिव्यांनी उजळलेल्या श्री विश्वविनायक रथात विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकातून निघाली. हा क्षण अनुभवण्याकरिता गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण रथावर लावण्यात आलेल्या २२५ आकर्षक झुंबरांनी रथाच्या वैभवात भर घातली. स्व-रूपवर्धिनी ढोल-ताशा-ध्वज पथक आणि बालवारकऱ्यांची गणरायाला मानवंदना हे विशेष आकर्षण ठरले.

विनायक देवळणकर यांचे नगारावादन, दरबार आणि प्रभात बँडपथके मिरवणुकीत सहभागी  झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी पांचाळेश्वर घाट येथे हौदात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh immersion in maharashtra 2018
Show comments