पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडई येथील पुतळ्यापासून काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मानाचा पहिला कसबा गणपतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली. त्यानंतर आज दुपारी ३ वाजता भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळांच्या मिरवणुकीने सांगता झाली. ही विसर्जन मिरवणूक तब्बल २८ तास चालली, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा >>> विसर्जन मिरवणूक दणदणाटीच… लक्ष्मी रस्त्यावर किती होती ध्वनिपातळी?
यावेळी पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त संदीपसिंह गिल हे उपस्थित होते. यावेळी अमितेशकुमार म्हणाले की, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीकरिता जवळपास आठ हजार अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर होते, त्यामुळे शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली. तसेच लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील काही ठिकाणी लेझर लाईटचा वापर केल्याची माहिती समोर येत असून काही मंडळांनी डेसिबलचीदेखील मर्यादा ओलंडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा मंडळांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, आता माझ्याकडे त्याबाबत संख्या उपलब्ध नसल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले. तसेच या सर्व घडामोडीदरम्यान सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने योग्य नियोजन केल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत ही मिरवणूक चालली. या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे यंदादेखील अखेरचा मंडळ भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळ हे गणपती विसर्जनासाठीचे शेवटचे मंडळ ठरले असून ही मिरवणूक २८ तास चालल्याचे त्यांनी सांगितले.