गणेशोत्सवासाठी स्वस्त विजेचा पर्याय असतानाही शहरातील बहुतांश गणेश मंडळांकडून घरगुती किंवा व्यावसायिक वीजजोडातून धोकादायकपणे वीज घेण्यात येत आहे. अशा प्रकारे वीजपुरवठा घेण्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. गणेशोत्सवात गणेश मंडळांसाठी महावितरण कंपनीकडून घरगुतीपेक्षाही कमी दराने तात्पुरता वीजजोड देण्यात येतो. त्यामुळे मंडळांनी या प्रकारचा अधिकृत वीजजोड घेऊन अपघातांचा धोका टाळावा, असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. या सर्व तयारीमध्ये गणेश मंडळांकडून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या वीजजोडाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसते आहे. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवासाठी महावितरण कंपनीकडून तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोड देण्यात येतो. गणेशोत्सवासाठीही हा अधिकृत वीजजोड देण्यात येत असतो. मुख्य म्हणजे घरगुतीपेक्षाही कमी दराने म्हणजेच प्रती युनिटसाठी या वीजजोडाला केवळ ३ रुपये ७१ पैशांची आकारणी केली जाते. या वीजजोडासाठी कोणताही स्लॅब नसल्याने कितीही युनिटपर्यंत याच दराने आकारणी केली जाते.
विजेचा हा स्वस्तातला पर्याय असतानाही बहुतांश गणेश मंडळांकडून धोकादायक पद्धतीने वीज घेतली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. एखाद्या घरातून किंवा दुकानातून वीज घेतली जाते. गणेश मंडळाकडून होणाऱ्या विजेच्या वापराच्या तुलनेत संबंधित वीजजोडाची क्षमता कमी असल्यास त्यातून विजेच्या संदर्भातील अपघात होऊ शकतो. त्यामुळे महावितरणकडून देण्यात येणारा अधिकृत वीजजोड घेणे सुरक्षा व आर्थिकदृष्टय़ाही योग्य आहे. याबाबतची मागणी नोंदविल्यास हा वीजजोड तातडीने देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
गणेश मंडळांनी विजेबाबत घ्यावयाची काळजी
– सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था अधिकृत वीजकंत्राटदाराकडूनच करून घ्यावी.
– मंडपासाठी वापरण्यात येणाऱ्या वीजवाहिन्या वीजभारासाठी सक्षम असाव्यात. तसे न केल्यास शॉर्टसर्कीटचा धोका निर्माण होतो.
– पावसाळी दिवस असल्याने व मंडपासाठी पत्र्यांचा वापर होत असल्याने वाहिन्या ढिल्या किंवा अनेक ठिकाणी टेपने जोडलेल्या नसाव्यात.
– वीजपुरवठा व विद्युत जनित्रासाठी स्वतंत्र न्यूट्रल घ्यावे. तसे न केल्यास वीजपुरवठा बंद असताना विद्युत जनित्र सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे विद्युत जनित्रातील वीज वाहिन्यांमध्ये प्रवाहीत होऊन जीवघेणे अपघात घडतात.
– विजेच्या लघुदाब व उच्चदाब वाहिन्या व रोहित्राचा गणेशोत्सवातील किंवा मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
– तातडीच्या मदतीसाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी चोवीस तास सुरू असणाऱ्या १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच संबंधित क्षेत्रातील महावितरणच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत.
स्वस्त विजेचा पर्याय असतानाही गणेश मंडळांकडून धोकादायक वीजजोड
बहुतांश गणेश मंडळांकडून घरगुती किंवा व्यावसायिक वीजजोडातून धोकादायकपणे वीज घेण्यात येत आहे
First published on: 15-09-2015 at 03:16 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav mandap electricity supply