सर्व जण ज्या गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात तो एका आठवडय़ावर येऊन ठेपला आहे. त्याबरोबरच शहरातील अघोषित रस्तेबंदीस देखील सुरुवात झालेली आहे. मुख्य रस्त्यांवर तसेच गल्ली बोळात वाहतूक तसेच पादचाऱ्यांसाठी अडथळा ठरणारे मोठमोठे मंडप उभारण्यात येत आहते.
शहरातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, विविध पेठा या महत्त्वाच्या भागांमध्ये गणपतीसाठी उभारण्यात आलेल्या मंडपांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पुण्यातील गल्लीबोळातील आधीच चिंचोळ्या असणाऱ्या रस्त्यांवर गणोशोत्सव मंडप उभारल्यामुळे होता तेवढा रस्ता देखील नाहीसा झाला आहे. मंडप उभारण्यासाठी लागणारे साहित्य देखील रस्त्यावर अस्ताव्यस्त पडून असल्याने सामान्य नागरिकाला रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, नागनाथ पार, चिमण्या गणपती, चिंचेची तालीम अशा अनेक ठिकाणी असे मोठेमोठे मंडप उभारण्यात आले आहोत.
चिंचेची तालीम येथील गणपती मंडळाच्या मंडपामुळे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त रस्ता अडवला गेला असून एका वेळी एकच चारचाकी जाऊ शकते इतकीच जागा शिल्लक आहे. नारायण पेठेतील मातीचा गणपती मंडळाचा मंडप तर चौकातच उभा केला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. दगडुशेठ हलवाई ट्रस्टच्या गणपती मंडपामुळे सुद्धा अशीच वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसते.
शहरात गणपती बसण्याच्या आधीच असे दृश्य असल्यावर ऐन गणपतीत शहराचे चित्र काय असणार आहे याची कल्पना सुद्धा करणे कठीण आहे. याकडे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील दुर्लक्ष करण्यात येत आहे असे दृश्य दिसते. स्मार्ट सिटी चे स्वप्न पाहणाऱ्या पुण्याचे रस्त्यात खड्डे करून मंडप बसविणे, १०-१२ दिवस  मंडपांमुळे रस्ते अडविणे असे चित्र दिसत असून शासनाचे या प्रकाराला उत्तेजन देण्याचेच धोरण दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा