पुणे : गणेशोत्सवाला अगदी काही तास शिल्लक राहिले असून गणेश मंडळ किंवा घरगुती बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.तर पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात. या गणेशोत्सवामध्ये अनेक मंडळ सामाजिक आणि चालू घडामोडींबाबत देखावे सादर करून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याच काम करीत असतात. हे सर्व नागरिकांचे प्रामुख्याने आकर्षण असते.
यंदा पुण्यातील कसबा पेठ परिसरातील मूर्तिकार सतीश तारू यांच्याकडे सध्याच्या सत्तांतर या विषयावर देखावा तयार करून मागविला आहे. यामध्ये मागील चार वर्षाच्या काळात राज्यात घडलेल्या सत्तांतरच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक कार्यकर्ता विठुरायाकडे, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी प्रार्थना करणारा असा देखावा सतीश तारू यांनी साकारला आहे. या देखाव्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.
या देखाव्या बाबत मूर्तिकार सतीश तारू यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मागील ५० वर्षांपासून शहरातील मंडळाच्या मागणीनुसार देखावे तयार करीत आहे. त्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या, गड संवर्धन शैक्षणिक, कौटुंबिक आणि राजकीय असे देखावे आजवर तयार केले आहेत. तर यंदा एका मंडळाच्या मागणीनुसार सध्याच्या सत्तांतरची घडामोडी लक्षात घेऊन राजकीय देखावा तयार केला आहे. विविध पक्षातील कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. आता आपण कोणत्या पक्षात रहावे, या संभ्रम अवस्थेत आहेत. रोज एकमेकांशी भांडण करतात आणि त्याच्याच दुसर्या दिवशी तो नेता, कार्यकर्ता दुसर्या पक्षात पाहण्यास मिळतो. त्यावर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अस गार्हाणं एक कार्यकर्ता विठ्ठलाकडे मांडतो. त्यावर विठुराया म्हणतात ‘ए वेड्या हे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे हातामध्ये घेऊन एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा, तिरंगा हाती घे आणि आपल्या देशाच रक्षण कर, शत्रूची डोकी फोड, त्यातून तुला हुतात्म्य प्राप्त होईल. असं विठुराया त्या कार्यकर्त्याला सांगत आहेत. अशा स्वरूपाचा देखावा साकारण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.