‘घरातल्या गणपतीची मूर्ती लहान असो किंवा मोठी; सजावट मात्र पर्यावरणपूरकच करायची,’ हे ब्रीद गेली कित्येक वर्षे अगदी मनापासून पाळणारी काही मंडळी एकत्र आली आणि सुरू झाली देवाणघेवाण एकमेकांकडील सजावटीच्या नावीन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक कल्पनांची.. निमित्त होते ‘लोकसत्ता-इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धे’च्या पारितोषिक वितरण समारंभाचे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत ‘लोकसत्ता-इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धे’चा पारितोषक वितरण समारंभ गुरुवारी पुण्यात पार पडला. या वेळी दहा स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. मोनिका महाजन यांनी ९,९९९ रुपयांचे प्रथम पारितोषिक, तर यशवंत कुलकर्णी यांनी ६,६६६ रुपयांचे द्वितीय पारितोषिक पटकावले. याशिवाय आनंद गणोरकर, अक्षय वाली, ध्रुव देशपांडे, निवेदिता डिके, रागिणी मुळे, सुहास कुलकर्णी, अनिल टिळेकर आणि पूनम देशपांडे यांनी प्रत्येकी २००१ रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली.
सणाचे निमित्त साधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याच्या हेतूने ‘लोकसत्ता’तर्फे गेल्या आठ वर्षांपासून इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवातही घरगुती गणपतींच्या सजावटीसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख प्रायोजकत्व लाभले
अशी झाली पर्यावरणपूरक सजावट :
‘‘मी यंदा लेण्याद्रीच्या लेणींची सजावट केली होती. रद्दी वर्तमानपत्रांचे कपटे वापरून घरी खळ तयार करुन तीन भिंती तयार केल्या आणि त्या खऱ्या वाटाव्यात यासाठी त्यांना खडबडीतपणा आणला. जुन्या कागदी बॉक्सपासून पेपर रोलपर्यंतच्या सर्व कागदी वस्तूंचा वापर सजावटीत केला. लेणीमधील शिलालेख, भिंतींमध्ये असलेल्या गणपतीची लहान मूर्ती हे सर्व पर्यावरणपूरक साहित्यातूनच बनवले. गणपतीची मूर्तीही शाडूचीच वापरली.’’
– मोनिका महाजन
—
‘‘ केवळ रद्दी वर्तमानपत्रांना घडय़ा देऊन आम्ही मखर तयार केले होते. ‘टाकाऊ’ म्हणून बाजूला पडलेल्या वस्तूच सजावटीत वापरल्या. मखरासाठी वापरलेल्या लाकडी काठय़ाही कापड दुकानांमधून शोधून आणल्या होत्या.’’
– यशवंत कुलकर्णी
—–
‘‘कागदांची टय़ुलिपची फुले तयार करुन मी सजावटीचे ‘टय़ुलिप गार्डन’ केले होते. त्यात चौरंगाच्या झोपाळ्यावर गणपती बसवला होता.’’
– रागिणी मुळे
—–
‘‘गणपतीच्या महिरपीच्या बाजूने आम्ही ५०१ नारळांची सजावट केली होती. गणपतीची मूर्तीही कागदाच्या लगद्याची वापरली.’’
– जगदीश देशपांडे
—–
‘‘गणपतीच्या मागच्या बाजूस आम्ही कागदाचे झाड केले होते. तसेच वेगवेगळे फलक लावून पाणी वाचवण्याचा संदेश दिला होता.’’
– आनंद गणोरकर
—–
‘‘गणपतीलाही ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असेल याचे चित्रण आमच्या सजावटीत दाखवले होते. ध्वनी, हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाकडून प्रदूषणविरहित जगाकडे कसे जाता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला.’’
– स्मिता कुलकर्णी, सुहास कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा