विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच आलेल्या यंदाच्या गणेशोत्सवाचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी राजकीय नेते सरसावले आहेत, त्यामुळे बहुतांश गणेश मंडळांची चांगलीच चंगळच होणार आहे. सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांना निवडणुकीत मंडळांचा पाठिंबा हवा आहे. तर, मंडळांना तगडी वर्गणी हवी आहे. त्यामुळे एकमेका साहाय्य करू, म्हणतानाच वर्गणीचे आकडे आमदारकीच्या उमेदवारांचे पाठबळ ठरवणार आहेत.
शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघांत निवडणुकांची ‘धूम’ आहे. शुक्रवारी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याने मंडळांकडून देखाव्यावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे, मोठय़ा वर्गण्या देणाऱ्या राजकीय नेत्यांकडे तसेच आमदारकीच्या दावेदारांकडे पाठपुरावाही सुरू आहे. अकरा हजारांपासून एक लाख रुपये वर्गणी उमेदवारांकडे मागितली जात असून वेळप्रसंगी मंडळांकडून साहित्यपुरवठय़ाची मागणी होताना दिसते आहे. तगडी वर्गणी दिल्यास नेत्यांना मंडळांच्या दर्शनी भागात झळकण्याची सुवर्णसंधी देण्याची हमी दिली जात आहे. धनाढय़ म्हणवणारे उमेदवारही मंडळांची ‘मोठी अपेक्षा’ पूर्ण करू शकत नसल्याने आढेवेढे घेताना दिसत आहेत. एकामागोमाग येणाऱ्या सणांचा व त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या अशा वर्गण्यांचा नगरसेवकांना व लोकप्रतिनिधींना किती त्रास होतो, याची खंत एका आमदाराकडून सातत्याने व्यक्त केली जाते. तर, वर्गणीचा ससेमिरा टाळण्यासाठी एक आमदार कसा रुग्णालयात दाखल होतो, याची मंडळांमध्ये चर्चा आहे. चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या एका नगरसेवकाने पावत्या फाडून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच कामाला लावली असून येणाऱ्या प्रत्येक मंडळाला ‘संतुष्ट’ केले जात आहे. गेल्या गणेशोत्सवात काही मंडळांना एका नेत्याने दिलेले धनादेश वठलेच नाहीत, याची आठवणही मंडळांना आहे. तसा कोणीही ‘चुना’ लावू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. वर्गणीला नकारघंटा दिल्यास आरतीला बोलावून पावती फाडण्याचा पर्यायही मंडळांकडे आहे.