शहरातील शांतता धोक्यात आणणाऱ्या काही अप्रिय घटना घडल्या आहेत. त्यामुळे गणेश मंडळांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना सामाजिकतेचे भान ठेवावे, असे आवाहन पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी शुक्रवारी केले.
विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदर्श गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या मंडळांना माथूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी पोलीस सहआयुक्त संजय कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, प्रकाश मुत्याळ, अब्दुर रेहमान, शहाजी सोळुंके, न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई, डॉ. दिलीप कामत आदी उपस्थित होते.
माथूर म्हणाले की, शहराला दहशतवादाचा धोका आहे. फरासखाना पोलीस ठाण्यासमोर झालेला बॉम्बस्फोट, फेसबुकवर महापुरुषांची विटंबना या प्रकारामुळे शहराची शांतता धोक्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी पोलिसांशी समन्वय साधून पोलिसांना मदत करावी. त्याचबरोबर, शहर पोलीस विघ्नहर्ता न्यासाकडून गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक पालकत्व योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत पुढील वर्षांपासून वाढ केली जाईल, असेही माथूर यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी सकाळी अकरा वाजता गणेश मंडळे व पोलिसांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सुरक्षित गणेशोत्सव होण्यासाठी गणेश मंडळे व पोलीस यांच्यात समन्वय कसा साधावा, यावर चर्चा होणार आहे.
एक दिवसाचा पगार माळीणसाठी
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दरड कोसळून १५१ नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये आठ नागरिकांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी माळीण गावातील दुर्घटनाग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याची घोषणा विघ्नहर्ता न्यासाच्या कार्यक्रमात केली.

Story img Loader